---Advertisement---
नंदुरबार : पोलिसांकडे चारित्र्य पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाबाबत लवकर कार्यवाही करावी यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सैताणे, ता. नंदुरबार येथील एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र शांतीलाल बुवा, रा. सैताणे, ता. नंदुरबार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, सैताणे येथील सूरज हिरालाल बुवा याचे चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आला होता.
तो अर्ज पोलिस मुख्यालयातील संबंधित शाखेकडे गेल्यावर तेथे कार्यवाही केली जाते. १४ रोजी राजेंद्र बुवा हे अर्जदार सूरज यांना घेऊन पोलिस मुख्यालयात आले. तेथे त्यांनी संबधित महिला कर्मचाऱ्याला आताच्या आता अर्जावर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
त्यावर महिला कर्मचाऱ्याने आजच तुमचा अर्ज येथील कार्यालयात आलेला आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे सांगितले असता बुवा याने त्यांच्याशी हुज्जत घातली व कार्यालयात आरडाओरड केला. शासकीय कामात अडथळा आणला.
यावेळी तेथे असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे संबधित महिला पोलिस कर्मचारी यांनी नंदुरबार शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र बुवा याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहे.