Shri Ram Navami : मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते महाआरती; जळगावात आज शोभायात्रा

जळगाव : श्रीराम नवमीनिमित्त शहातील नवीन बस्थानकासमोरतील चिमुकले राम मंदिर येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे, जळगाव लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अयोध्येत प्रभू श्रीराम आपल्या मूळ जन्मस्थळी विराजमान झाले आहेत, हाच जल्लोष संपूर्ण भारताने साजरा केल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम नवमीनिमित्त सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेत आकर्षक ठरणारी प्रभू श्रीरामांची बारा फूट उंच मूर्ती असणार आहे.

सोबतच नऊ फूट उंच हनुमानाची मूर्तीचे आकर्षण ठरणार आहे. विश्वहिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, ललित चौधरी, अमित भाटिया, बंटी नेरपगारे, राकेश लोहार यांच्या नियोजनात मिरवणूक निघेल.

गोलाणी मार्केटमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिरपासून दुपारी चारला मान्यवरांच्या हस्ते महाआरती होऊन शोभायात्रेला सुरवात होईल. तेथून नाथ प्लाझा, टॉवर चौक, चित्रा चौक, दाणा बाजार, सुभाष चौक, जुने जळगाव परिसरातील श्रीराम मंदिरात शोभायात्रेची सांगता होईल.

शोभायात्रेत प्रभू श्रीरामांसोबत लक्ष्मण, सीतामाता व हनुमान यांची वेशभूषा धारण करून सजीव देखावा करण्यात येणार आहे. रावेर येथील आखाड्याचे पथक डोळ्यावर पट्टी बांधून दांडपट्टा फिरविण्याचे सादर करणार आहेत. वरणगावचे लेझीम पथक, पन्नास दुर्गा पथक पारंपरिक वेशभूषा करून सहभाग घेणार आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दीडशे ते दोनशे धारकरी हातात भगवा ध्वज घेऊन संपूर्ण शोभायात्रेत असणार आहेत.