जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात श्रीरामनवमी महोत्सवानिमित्त श्रीरामभक्तिपर प्रवचनमाला रविवार (३० मार्च) ते ७ एप्रिलअखेर आयोजित केल्याची माहिती संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी दिली.
श्रीराम नवमी महोत्सवात दररोज प्रातः काकडा भजन, आरती होईल. प्रभू श्रीरामचंद्रांचा पंचामृत अभिषेक, पोशाख, तुलसी अर्चन, श्रीविष्णुसहस्रनाम, आरती, सकाळी ८ ते १२ श्रीअध्यात्म रामायणाचे पारायण, दुपारी नैवेद्य, दु. ४ ते ६ जळगावातील विविध महिला मंडळांची भजन सेवा, सायंकाळी ६ वा. हरिपाठ, श्रीरामरक्षा स्तोत्र व त्रयोदशाक्षरी महामंत्र जप, ७वाजता धुपारती, ७:३० वाजता प्रवचन सेवा, रात्री ८ वाजता श्री महाराजांचे परंपरेचे भजन होईल.
महोत्सवात दररोज सायंकाळी ७:३० वाजता मुकुंदकाका धर्माधिकारी गुरुजी यांचे रसाळ व ओघवत्या वाणीतून प्रवचने होतील. ३० मार्च ते ६ एप्रिलअखेर अध्यात्म रामायणाचे पारायण श्री. मकरंद देशमुख गुरुजी करतील. ३ एप्रिलला सकाळी ८ वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या उत्सवमूर्तीस १६०० पुरुषसूक्त आवर्तनाने म हाभिषेक करण्यात येणार आहे. ६ एप्रिलला श्रीराम नवमीनिमित्त प्रभू श्रीरामचंद्रांचा महाभिषेक, विशेष पूजा होईल. सकाळी १०:३० ते १२ श्रीराम जन्मोत्सवाचे गुलालाचे कीर्तन ह.भ. प. श्रीराममहाराज जोशी यांचे होईल.
दुपारी बाराला प्रभू श्रीरामचंद्रांची महाआरती होईल. संध्याकाळी ७वा. ब्रह्मवृंदांचा वेदमंत्रघोष होईल. रात्री ८ वाजता गीतरामायण हा कार्यक्रम जळगाव संस्कार भारतीतर्फे घेण्यात येणार आहे. ७ रोजी श्रीगुरू महाराजांचे परंपरेचे गोपाळकाल्याचे भजन होऊन महोत्सवाची सांगता होईल. भाविकांनी यात सहभागी होऊन दर्शनाचा अवश्य लाभघ्यावा, असे आवाहन श्रीगुरू मंगेश महाराज जोशी यांनी केले आहे.