तरुण भारत लाईव्ह ।१५ जानेवारी २०२३। भारतातील अयोध्या आणि नेपाळमधील जनकपूर या दरम्यान पर्यटन ट्रेन सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला असून, पुढील महिन्यापासून हि सेवा सुरु करणात येणार आहे. श्रीराम-जानकी यात्रा असे या विशेष रेल्वे गाडीचे नाव असणार आहे.
रेल्वे प्रशासनाने शनिवारी याबाबतची माहिती एक निवेदन जारी करून दिली. राजधानी दिल्लीतून १७ फेब्रुवारी रोजी हि पर्यटन ट्रेन अयोध्येकडे रवाना होईल. या विशेष गाडीमुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन मिळून ते आणखी मजबूत होईल असे रेल्वेने निवेदनात म्हटले आहे. या पर्यटन ट्रेन च्या प्रवासात नंदीग्राम, सीतामढी,काशी आणि प्रयागराज या पर्यटन स्थळांचाही समावेश राहणार आहे.
या प्रवासादरम्यान जनकपूर आणि वाराणसी येथील हॉटेलात दोन रात्रीच्या मुक्कामाचाही समावेश असेल. अयोध्या, सीतामढी आणि प्रयागराज या पर्यटन स्थळांना दिवसभराच्या प्रवासातच भेट देता येईल.
अशी असेल ट्रेन
हि ट्रेन संपूर्ण स्वदेशी बनावटीची असून, ती डिलक्स एसी असणार आहे. यात दोन दर्जेदार रेस्टोरंट राहतील. ट्रेनच्या डब्ब्यातच अत्याधुनिक शॉवर व्यवस्था आणि गाडीतच प्रवाशांना पायाला मसाज करता येईल.
असा असेल प्रवास
दिल्लीहून हि ट्रेन अय्योधेत पोहोचेल. अय्योधेतून ती बिहारमधील सीतामढीला रवाना होईल. तिथून नेपाळमधील जनकपूर पर्यंतचा ७० किमी चा प्रवास बसद्वारे.
ईएमआयची सुविधाही उपलब्ध
या गाडीतील प्रवाशांसाठी ईएमआयची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने पेटीएम आणि रेझरपेसोबत करार केला आहे. संपूर्ण पैसे एकाचवेळी भरण्याची क्षमता नसलेल्या प्रवाशांना ३,६,९,१२,१८ आणि २४ महिन्यांची ईएमआय सुविधा मिळणार आहे.