---Advertisement---
जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून तापमानाने आता चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी (१० मार्च) जळगावमध्ये कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. चालू हंगामातील आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद असल्याने वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
ममुराबाद येथील हवामान वेधशाळेने ही तापमान नोंद केली आहे. मागील चार दिवसांत तापमानात सुमारे तीन अंशांची वाढ झाल्यामुळे उष्णतेची झळ अधिक तीव्र जाणवत आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागतो, तर दुपारच्या वेळेत कडक उन्हामुळे शहरातील रस्त्यांवरही तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे.
राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून तेथे पारा ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. त्यानंतर जळगाव हे राज्यातील दुसरे सर्वाधिक तापमान असलेले शहर ठरले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी यापूर्वीच ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी (११ मार्च) देखील तापमान सुमारे ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उकाडा आणखी वाढू शकतो आणि नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.









