दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने वहिनीचा खून ; दिरास जन्मठेप

धुळे : दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून दिराने वाहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून केल्याचा दिल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील छावडी गावात २०२१ मध्ये घडला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यात आरोपी दीर भास्कर निंबा पिंपळे (वय ३९) यास जन्मठेपेच्या शिक्षेसह १ हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची सक्तमजुरी आदेश दिला आहे.

साक्री तालुक्यातील छावडी गावात शकुंतलाबाई ओंकार पिंपळे यांच्या दिराच्या मुलाने दारु पिण्यासाठी ११ ऑगस्ट २०२१ रोजी वहिनी पैशांची मागणी केली होती. मात्र ,  शकुंतलाबाई यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग येऊन दीर भास्कर निंबा पिंपळे याने शकुंतलाबाई यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शकुंतलाबाई यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान १७ ऑगस्ट २०२१ रोजी मृत्यू झाला. यानंतर वाढीव कलमान्वये दीर भास्कर पिंपळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाधिकारी उपनिरीक्षक सुनील वसावे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश दीपक एल. भागवत यांच्या न्यायालयात चालले. यात ८ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. आरोपी दीर भास्कर निंबा पिंपळे यास न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेसह १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्रसिंह तवर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील अॅड. अजय सानप यांनी काम पाहीले.