सहा फूट उंचावरून शाळेच्या आवारात पडली कार!

तरुण भारत लाईव्ह न्युज  जळगाव : शहरातील महाबळ परिसरातील तिवारी नगरातील चढतीवरून उतरताना एक कार सहा फूट उंचीवरून शाळेच्या आवारात खाली पडल्याचा प्रकार रविवारी सकाळी घडला. यात कारचे नुकसान झाले, मात्र गाडीतील तिघांना किरकोळ जखमा झाल्या.

महाबळ परिसरात तिवारी नगर आहे. नजीकच बाहेती विद्यालय आहे. तिवारी नगराकडून मोहन नगरकडे जाण्या-येण्यासाठी हा रस्ता आहे. अतिशय उंच असा हा रस्ता असून पूर्वी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. रस्त्यावर बाहेती विद्यालयाच्या बाजुने खोल भाग आहे. सुरूवातीला जवळपास पंधरा फूट व नंतर दोन ते तीन फूट खोल असा हा रस्ता आहे. शाळेच्या बाजूने कठडे बनवावेत, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. कारण या ठिकाणी नेहमी किरकोळ अपघात होत असतात. त्याचा प्रत्यय पुन्हा रविवारी सकाळी ९ ते ९.१५ वाजेच्या दरम्यान आला.

शाळेस सुट्टी  नसती तर….

गाडी ज्या ठिकाणी पडली त्या भागात बाहेती शाळेतील मुलांची रोज गर्दी असते. सकाळच्या वेळेस ग्राऊंडवर विद्यार्थी खेळत असतात. मात्र आज रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती म्हणून  या ठिकाणचा मोठा अनर्थ टळला, असे परिसरातील नागरिक सांगत होते. रस्त्याला खालच्या बाजूने पोकळ भाग झाला आहे? तोदेखील धोकादायक ठरू शकतो. मागे या भागात राहणार्‍या एका रहिवाशाच्या घरात उतरतीवरून खाली येणारे ट्रॅक्टर घुसले होते. ही बाब लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने मोठा होण्यापूर्वी रस्त्याला उतरतीच्या बाजूने कठडे बसवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

कार पडली खाली

मोहन नगरकडून आलेली एक कार या रस्त्याने उतरतीवरून खाली येत असताना जवळपास सहा फूट खोलपर्यंतच्या जागेत आली असता रस्त्याचा अंदाज न आल्याने खाली पडली. या कारमध्ये एक महिला व दोन पुरूष होते. गाडीतील तिघांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तिघांना गाडीतून बाहेर काढले.