जळगाव : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यावर भर दिला जात आहे. लवकरच महाराष्ट्रातही स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. नागपूर रेल्वे विभागाने नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई या मार्गांवर स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला असून, या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजते.
महाराष्ट्रातील मार्ग आणि स्थानके
नागपूर-पुणे मार्गावर ही स्लीपर वंदे भारत ट्रेन वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्थानकांवर थांबण्याची शक्यता आहे. तर नागपूर-मुंबई मार्गावर नागपूर, वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक, कल्याण/ठाणे, दादर आणि मुंबई या स्थानकांवर थांबा असेल.
देशातील पहिली स्लीपर वंदे भारत
रेल्वे मंत्री आणि रेल्वे विभागाच्या वतीने अलीकडेच वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या फोटोचे अनावरण करण्यात आले. पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन दिल्लीला मिळणार असून, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचे लोकार्पण होईल. नागपूर विभागाला महाराष्ट्रातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा मान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रवाशांना अधिक सोयी आणि वेगवान सेवा
स्लीपर वंदे भारत ट्रेनमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक आरामदायक सुविधा आणि जलद सेवा प्रवाशांना मिळणार आहे. विशेषतः भुसावळ आणि जळगावसह इतर प्रमुख स्थानकांवर या ट्रेनचा थांबा असल्याने स्थानिक प्रवाशांनाही फायदा होईल.
स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या आगमनाने प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होईल आणि महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासाचा वेगही वाढेल.