मागील दोन ट्रेडिंग सत्रात बाजारात तेजी दिसून आली होती,तर आज आठवड्यातील पहिल्या दिवशी शेअर बाजारात सपाट सुरुवात दिसून आली. सेन्सेक्स १४२ अंकांच्या वाढीसह ७४,४७४ वर उघडला. निफ्टी ३१ अंकांनी घसरून २२,५२१ वर उघडला. बँक निफ्टी देखील लाल रंगात व्यवहार करताना दिसला. बँक निफ्टीने १८५ अंकांनी घसरून ४८,३१२ वर व्यवहार सुरू केला.
आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीस निफ्टीमध्ये तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये सन फार्मा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस, जेएसडब्ल्यू स्टील यांचा समावेश होता. याउलट, घसरण होत असलेल्या शेअर्समध्ये इंडसइंड बँक, एम अँड एम, एल अँड टी, बजाज ऑटो, आयटीसी यांचा समावेश होता.
कमोडिटी बाजाराची स्थिती ?
कच्च्या तेलात किरकोळ घट झाली आणि ते प्रति बॅरल ७० डॉलरवर आले, तर सोने २,९२० डॉलरवर आणि चांदी १% च्या घसरणीसह ३३ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. क्रिप्टो बाजारात मोठी घसरण झाली, ज्यामध्ये बिटकॉइन ६% ने घसरले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिटकॉइन रिझर्व्हबाबतच्या कार्यकारी आदेशानंतर ही घसरण झाली आहे.
भारतातील आर्थिक आघाडीवर, रिझर्व्ह बँकेने इंडसइंड बँकेचे एमडी आणि सीईओ सुमंत कठपालिया यांचा कार्यकाळ तीन वर्षांऐवजी फक्त एका वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, कर्नाटक सरकारने मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट तिकिटांच्या किमतीवर अंकुश लावला आहे आणि तो कमाल २०० रुपयांपर्यंत मर्यादित केला आहे.