लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका मुलीने घरवापसी करून सनातन धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्कान सैफी असे या मुलीचे नाव असून ती आता खुशी या नावाने ओळखली जाणार आहे. खुशीने मंदिरात राजेश कुमार नावाच्या तरुणाशी लग्नही केले आहे. यावेळी त्यांनी वैदिक विधींनुसार हवन केले आणि गायत्री मंत्राचा जप केला. हा विवाह रविवार, दि. ३० जून २०२४ अगत्स्य मुनी आश्रमात झाला. यावेळी आचार्य पंडित के.के.शंखधर यांच्यासह हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.
मुस्कान सैफी ही मूळची संगम विहार, दिल्लीची रहिवासी आहे. तिचे वडील सुरुवातीला हिंदू होते पण दिल्लीतील एका मुस्लिम महिलेशी लग्न केल्यानंतर त्यांनी इस्लाम स्वीकारला. दरम्यान, मुस्कानने बरेलीच्या इज्जत नगर भागातील राजेश कुमारशी सोशल मीडियावर बोलणे सुरू केले. काही दिवसातच दोघे चांगले मित्र बनले. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. १९ वर्षीय मुस्कान आणि २३ वर्षीय राजेश यांना लग्न करायचे होते, पण त्यांचे कुटुंबीय या नात्याला विरोध करत होते.
मुस्कानवरही अनेक बंधने घालण्यात आली होती. मुस्कानचा प्रियकर राजेश त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यांना अगत्स्य मुनी आश्रमाची माहिती मिळाली. रविवार, दि. ३० जून २०२४ बरेली येथील राजेश आणि दिल्लीतील मुस्कान सैफी त्यांच्या काही ओळखीच्या लोकांसह आश्रमात पोहोचले. तिने आश्रमाचे पुजारी पंडित केके शंखधर यांना लग्नाची विधी करण्याची विनंती केली. पंडित शंखधर यांनी दोघांची कागदपत्रे पाहिली.
या सर्व कागदपत्रांमध्ये मुस्कानचे प्रतिज्ञापत्र देखील आहे ज्यामध्ये तिने कोणाच्याही दबावाशिवाय स्वेच्छेने घरवापसी करून लग्न केल्याचे सांगितले आहे. मुस्कानचे राजेशशी वैदिक रितीरिवाजानुसार लग्न झाले. विवाहानंतर आचार्य पंडित केके शंखधर आणि हिंदू संघटनांच्या इतर काही सदस्यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले. मुस्कान सैफी वधूच्या रुपात खुशी बनली आणि राजेश कुमार यांनी एकमेकांना पती-पत्नीच्या रुपात मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
मुस्कान सैफी सांगते की, तिची लहानपणापासूनच हिंदू धर्मावर श्रद्धा होती. मुस्कानने हेही लेखी दिले आहे की तिला माहित आहे की तिचे पूर्वज हिंदू होते ज्यांनी विविध अत्याचारांमुळे धर्मांतर केले होते. मुस्कान सैफी असेही म्हणते की इस्लाममध्ये महिलांचा आदर केला जात नाही आणि तिला तिहेरी तलाक आणि हलाला सारख्या वाईट प्रथांची भीती वाटते. लग्नानंतर मुस्कान आनंदाने सासरच्या घरी गेली आहे.