..तर वीजचोरांवर गुन्हे दाखल, महावितरणचा इशारा

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२२ । मीटरमध्ये फेरफार किंवा आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणची धडक मोहीम सुरू आहे. या कारवाईत अडथळे आणणाऱ्या तसेच वीजचोरीची बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.  अखंडित वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनीही सहकार्य करावे तसेच अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करण्यात आले आहेत. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. या २३० फीडरमध्ये जळगाव शहरातील विठ्ठलपेठ फीडरचा समावेश आहे. या फीडरवर जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली व २१ नोव्हेंबरला मोहीम हाती घेऊन कारवाई केली. त्यात ५२ जणांची वीजचोरी पकडण्यात आली तर २१२ आकडे काढण्यात आले.

या ग्राहकांना वीजचोरीची रीतसर बिले देण्यात आली. मात्र अनेक ग्राहकांनी बिले न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी ९ डिसेंबर रोजी महावितरणच्या जोशीपेठ कक्षाचे सहायक अभियंता उमाकांत पाटील व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गेले. मात्र जमावाने त्यांना घेराव घालून कारवाईत अडथळा आणला.

या प्रकरणाची गंभीर दखल महावितरणने घेतली असून वीजचोरीविरोधातील कारवाईत जे कुणी अडथळे आणतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करू, सोबतच शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले. तसेच वीजचोरीविरोधातील कारवाई थांबणार नसून, यापुढे अधिक जोमाने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

भारनियमन टाळण्यासाठी वीजगळती रोखणे आवश्यक
जळगाव शहर व जिल्ह्यात वीजगळतीचे प्रमाण अधिक असल्याने गत उन्हाळ्यात आपत्कालीन भारनियमन करण्याची वेळ आली होती. त्यामुळे आणीबाणीचे भारनियमन रोखायचे असल्यास ग्राहकांनी अधिकृत जोडणी घेऊनच वीज वापरावी, असे महावितरणने म्हटले आहे. वीकचोरी रोखल्यास संबंधित फीडरवर भारनियमनाची वेळ येणार नाही. वीजचोरीमुळे ट्रान्सफॉर्मरचा लोड वाढून ते फेल होण्याचे तसेच तारा तुटण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे तेथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्राहकांनी याचा सारासार विचार करून अधिकृत वीज वापरावी आणि नियमित वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.