वाराणसी ः गंगा नदीत आंघोळ करणे, कचरा फेकणे आता महागात पडू शकणार आहे. वाराणसीच्या महानगर पालिकेने अशा उपद्रवी लोकांना वठणीवर आणण्यासाठी नियम अधिकच कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, गंगेत साबण लावून आंघोळ करणार्यांवर
पाच हजार रुपयांचा आणि कचरा फेकणार्यांवर एक लाख रुपयांचा दंड
ठोठावला जाणार आहे. गंगा नदीच्या स्वच्छतेकरिता महापालिका येत्या 1 डिसेबरपासून विशेष मोहीम हाती घेणार आहे. या अंतर्गत गंगेच्या घाटांवर पहिल्यांदा साबण लावून आंघोळे करणे आणि कपडे धुणार्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्याच व्यक्तीने दुसर्यांदा असा प्रकार केल्यास त्याला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तीच व्यक्ती जर पुन्हापुन्हा असाच गुन्हा करीत असेल, तर त्याला त्या प्रत्येक वेळी 25 हजार रुपये दंड ठोठावला जाईल.