धक्कादायक ! शिपायाने केले चेंजिंग रूममध्ये विद्यार्थिनींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, आरोपी अटकेत

पुणे : पाषाण भागातील एका नामांकित शाळेत विद्यार्थिनींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिपाई तुषार सरोदे याने हा अमानवी कृत्य केल्याचे उघड झाले असून, चतुशृंगी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हा प्रकार ६ जानेवारी रोजी घडला. खेळाचा तास संपल्यानंतर विद्यार्थिनी किचन रूममध्ये ड्रेस चेंज करण्यासाठी गेल्या असताना शिपाई तुषार सरोदे हा तिथे उपस्थित होता. विद्यार्थिनींनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले असता, त्याने मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवून तो स्विच बोर्डवर ठेवला. विद्यार्थिनींनी सतर्कता दाखवत व्हिडीओ तात्काळ डिलीट केला आणि घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला.

पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे तक्रार केल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने प्रकरणाची चौकशी केली. सुरुवातीला आरोपी सरोदे याने नकार दिला, परंतु पुढील चौकशीत त्याने मोबाईल रेकॉर्डिंगसाठी ठेवल्याची कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत तसेच बी. एन. एस कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.