---Advertisement---

आईचा खून करणारा मुलगा पाच दिवसांनी एलसीबीच्या जाळ्यात

by team
---Advertisement---

जामनेर : तालुक्यातील वाकडी येथे ९० वर्षीय महिलेची राहत्या घरात मारहाण करत हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार , ११ रोजी उघडकीस आली होती. प्रथमदर्शनी हि हत्या अंगावरील दागिन्यांसाठी झाली असावी असे चित्र उभे  करण्यात आले होते. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अर्थात एलसीबीच्या पथकाने कसून तपास करीत अखेर पाच दिवसांनी या खुनाचा उलगडा केला आहे.  ९० वर्षीय आईला मिळणाच्या पेन्शनच्या रकमेपोटी मुलाने तिला जबर मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचे तपासामध्ये स्पष्ट दिसून आले आहे. दरम्यान, आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

राधाबाई भालचंद परदेशी (वय ९०, रा. वाकडी ता. जामनेर) असे मयत वयोवृद्ध महिलेचं नाव आहे. गावात त्या एकट्याच राहत होत्या. काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष (वय ६५) हा परिवारासह राहतो. त्याच्या दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत. शनिवारी सकाळी आई राधाबाई मुलगा सुभाष याच्या घरून त्या ११ ते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास निघून त्यांच्या घरी गेल्या होत्या. नंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान त्यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली. मयत महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि कानातील सोने ओरबाडून काढलेले दिसत होते. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनसह एलसीबीचे पथक तपास करीत होते.  त्यांनी सखोल तपास केला परंतु,  तपास लागत नव्हता. अखेर पाच दिवसानंतर एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाला यश आले. त्यांनी मयत राधाबाई यांचा मुलगा सुभाष भालचंद्र परदेशी यालाच अटक केली. त्याला याबाबत जाब विचारला असता त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सुभाष परदेशी याचे वडील अर्थात मयत राधाबाई यांचे पती भालचंद्र परदेशी हे शिक्षक होते. निवृत्त झाल्यावर त्यांना पेन्शन सुरू होती. भालचंद्र परदेशी हे वारल्यानंतर ती पेन्शन राधाबाई यांना सुरू होती. दरवेळेला एकत्र तीन महिन्याची पेन्शन घेण्यासाठी राधाबाई यांच्यासोबत मुलगा सुभाष हा जायचा. पेन्शनच्या रकमेमधून चार पाच हजार रुपये आई राधाबाई यांना देऊन बाकीचे सुभाष हाच ठेवून घ्यायचा. आता मात्र राधाबाईने पेन्शन घ्यायला स्वतः जायचा निर्णय घेतला आणि सुभाषला सोबत येण्यास नकार दिला होता. यामुळे सुभाषला आईच्या वागण्याचा राग आला होता. त्या वागण्यातून शनिवारी त्याने आईसोबत वाद घातला आणि आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत आई राधाबाई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुभाष हा लगेच त्याच्या घरी निघून गेला.पाच दिवस तो पोलीस तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. मात्र गावातील काही सीसीटीव्ही फुटेज आणि नेहमी तो आईला त्रास द्यायचा यामुळे सुभाष परदेशी याच्या वर्तनावरून पोलिसांना संशय आला आणि तिथेच खुनाची घटना उलगडली. तपास कामी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सफौ विजयसिंह पाटील, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, आक्रम शेख, महेश सोमवंशी यांच्यासह फत्तेपूर पोलीस स्टेशनने परिश्रम घेतले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment