तरुण भारत लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२२ । मुंबई-आग्रा महामार्गावरून अवैधरित्या दारूची वाहतूक करणार्या कारला सोनगीर पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून पकडले. यात ५ लाखांची कार व १ लाखांची देशी दारू असा एकूण सहा लाख नऊ हजार ४४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर क्र (एम.एच.48 एफ 4568) च्या कारमधून अवैधरित्या दारूची वाहतुक केली जात असल्याची गोपनिय माहिती सोनगीर पोलीस ठाण्याचे एपीआय चंद्रकांत पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने महामार्गावरील सोनगीर टोल नाक्याजवळ सापळा लावला.
दरम्यान, संशयित चालक नरेंद्र भिला कोळी (रा.खामखेडा, ता.शिरपुर) याला ताब्यात घेवून कारची तपासणी केली असता त्यात देशी दारू टँगोपंच नाव असलेले खाकी रंगाचे एकूण 30 बॉक्स व प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारूदारूच्या 180 मिली क्षमतेच्या काचेच्या 48 बाटल्या भरलेल्या आढळून आल्या. एक लाख नऊ हजार 44 रूपयांची दारू व पाच लाखांची कार जप्त करण्यात आली.
याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात नरेंद्र भिला कोळी (वय 33, रा. खामखेडा)व नारायण अशोक माळी, पिंटू भिल व मनोज महाजन सर्व रा.शिरपुर यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम 1849 चे 65 (अ) (ब) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.