भारतीय नागरिक होण्यापूर्वी सोनिया बनल्या होत्या मतदार : भाजपच्या ‘या’ नेत्याने केला आरोप

---Advertisement---

 

नवी दिल्ली: काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या प्रमुख सोनिया गांधी भारतीय नागरिक बनण्यापूर्वी मतदार बनल्या होत्या, असा धक्कादाय दावा भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी बुधवारी केला. एकीकडे, विरोधी पक्ष नेते ‘बिहारमधील मतदार यादी विशेष पडताळणी” (एसआयआर) व कथित ‘मत चोरी’ मुद्द्यावरून निवडणूक आयोग व भाजपवर हल्लाबोल करीत आहेत. त्यामुळे देशाचे राजकारण चांगलेच तापले असतानाच अमित मालवीय यांनी थेट सोनिया गांधी यांच्या मतदार बनण्यावर सूचकपणे बोट ठेवले आहे.

अमित मालवीय ट्वीटरवरून म्हणाले की, भारतातील मतदार यादीसोबत सोनिया गांधी यांचे नाते निवडणूक कायद्याची घोर पायमल्ली करणारे आहे. त्यामुळेच की काय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अपात्र व अवैध मतदारांना नियमित करण्याची बाजू घेत आहेत. ते बिहारमधील मतदार यादी फेरपडताळणीला तीव्र विरोध करीत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

सोनिया गांधी यांचे नाव पहिल्यांदा १९८० साली मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. तेव्हा त्यांच्याकडे इटलीचे नागरिकत्व होते. पण त्या भारतीय नागरिक नव्हत्या. तेव्हा गांधी परिवार १. सफदरगंज रोड, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अधिकृत निवासस्थानी वास्तव्यास होता. यावेळी तिथे नोंदणीकृत मतदार इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी आणि मेनका गांधी राहत होते. नवी दिल्ली संसदीय मतदारसंघात मतदार यादीत १ जानेवारी १९८० रोजी पात्रता तारखेबाबत स्वीकारत दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव मतदान केंद्र १४५ च्या क्रमांक ३८८ मध्ये जोडण्यात आले. हे कायद्याचे उल्लंघन होते. ज्यानुसार, मतदार नोंदणीसाठी भारतीय नागरिकत्व असणे अनिवार्य करण्यात आले होते, असा आरोप अमित मालवीय यांनी केला. १९८२ साली तीव्र विरोध झाल्यानंतर त्यांचे नाव वगळण्यात आले. मात्र, १९८३ साली ते पुन्हा जोडण्यात आले. सोनिया गांधींचे नाव मतदान केंद्र १४० क्रमसंख्या २३६ मध्ये नोंदवण्यात आले. ज्याची तारीख १ जानेवारी १९८३ मानण्यात आली. तर भारतीय नागरिकत्व ३० एप्रिल १९८३ ला मिळाल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला.

हे तर घोर निवडणूक गैरवर्तन
सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांना भारतीया नागरिकत्व स्वीकारण्यास १५ वर्षे का लागली? सोनिया गांधी नागरिकत्व मिळण्यापूर्वी मतदार बनल्या, हे तर घोर निवडणूक गैरवर्तन नव्हे तर काय आहे? असा सवाल अमित मालवीय यांनी ट्वीटरवरून उपस्थित केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---