CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश, सोयाबीन खरेदीला मिळाली मुदतवाढ

#image_title

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून, केंद्र सरकारद्वारे सोयाबीन खरेदीसाठीची तारीख वाढवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.

यापूर्वी पणन संचालयानातर्फे शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी होती. मात्र, शेतकऱ्यांकडून या कालावधीत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्रिय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना याबाबत विनंती केली होती. अखेर केंद्र सरकारकडून या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात बारदान्याअभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारी रोजी संपली होती. सोमवारी उशिरा पणन महासंघाला पत्राद्वारे 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने कळविली, अशी माहिती महासंघाचे प्रभारी एमडी अप्पासाहेब धुळाज यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले की, ‘पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करा. शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 15 ऑक्टोबर 2024 पासून सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली होती. आता 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढ मिळाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू असून आतापर्यंत विक्रमी 13 लाख 68 हजार 660  मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यात आला आहे.