जळगाव : राज्यात महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतरही सत्तास्थापनेला काही वेळ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत. परंतु, एकनाथ शिंदे हे सुरूवातीला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नव्हते, असा खुलासा राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
जळगावमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “आम्ही सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंची समजूत काढली आणि त्यांना सांगितलं की, तुम्ही सत्तेत असलं पाहिजे. त्यांचा त्यावेळी विरोध होता, पण आम्ही त्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण सत्तेत असलं पाहिजे.”
गुलाबराव पाटील यांनी सरकारच्या कार्यकाळातील देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या मनाचे वर्णन केले आणि त्या काळात फडणवीस यांनी सत्ताधारी गटांना मार्गदर्शन केल्याचेही सांगितले.
गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाच्या वाटपावरही भाष्य केले. “मंत्री होण्यासाठी विविध जिल्ह्यात अनेक सिनियर आमदार होते आणि काही जण तीन-तीन वेळा आमदार झाले होते.
तथापि, मी मंत्रीपदासाठी लॉबिंग केले नाही, कारण मला माहित होतं की पदासाठी किती अडचणी येतात,” असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, गुलाबराव पाटील यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला. “माझ्या सरकारच्या काळात पाणी पुरवठा खातं मिळालं, आणि हे राज्यातील पहिलं उदाहरण आहे,” असे ते म्हणाले.