धुळे जिल्ह्यातून हरवलेल्या महिला, अल्पवयीन मुलांचा शोधासाठी विशेष मोहीम

---Advertisement---

 

धुळे : जिल्ह्यातून हरवलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलांच्या शोधासाठी पोलिस विभागाकडून विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. याअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, मिसिंग सेल, एस.जे.पी.यू. आणि ‘पोलीस काका-दिदी’ या उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत १ हजार ८३७ महिलांचा शोध घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांप्रमाणे धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांतील १८ वर्षांखालील पीडितांचा चार महिन्यांहून अधिक काळ शोध लागत नसल्यास हे गुन्हे पुढील तपासास्यठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात येतात. धुळे येथे हा कक्ष २०२१ मध्ये स्थापन करण्यात आला.

हा कक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि गृह विभागातील पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतो. सद्यस्थितीत या कक्षामध्ये १ सपोनि, ३ पुरुष अंमलदार आणि ७ महिला अंमलदार कार्यरत आहेत. २०२१ पासून आतापर्यंत या कक्षाकडे ११२ अपहरणाचे गुन्हे वर्ग झाले असून त्यापैकी ५९ गुन्ह्यांची यशस्वी सोडवणूक करण्यात आली आहे. तसेच बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये विशेष बाल पोलीस पथके कार्यरत आहेत. या पथकांना नियमित प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून बालकांच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण केली जाते.

दरम्यान, १८ वर्षांवरील हरविलेल्या महिलांच्या शोधासाठी जिल्ह्यात ९ मिसिंग सेल स्थापन करण्यात आले आहेत. सन २०२२ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान एकूण २ हजार ४७० महिला हरवल्या असून त्यापैकी १ हजार ८३७ महीलांचा शोध लागला आहे. हे प्रमाण ७४.३७ टक्के आहे. तसेच १८ वर्षांखालील ६१९ मुले-मुली हरवले त्यापैकी ४५४ मुले-मुलीचा शोध लागला आहे. हे प्रमाण ७३.३४ टक्के आहे. केवळ १७ मे २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतच मिसिंग सेलने १३७ महिला व ३१ मुलांचा शोध घेऊन कारवाई केली आहे.

बुधवारी (१३ ऑगस्ट) जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, मिसिंग सेल, एस.जे.पी.यू. व पोलीस काका-दिदी यांची बैठक झाली. बैठकीत हरविलेल्या महिला व मुलांच्या शोधासाठी प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोलीस काका-दिदी पथकांना शाळा व महाविद्यालयांना नियमित भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्याच्या व त्या दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---