जळगाव : गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालया येथील श्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने पुनर्निवड झाली. श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे 2 जुलै 2023 रोजी मंदिर विश्वस्तांची बैठक पद्मालय येथे झाली. त्यात सर्व विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्ष अशोक जैन यांच्या नावाची घोषणा विश्वस्त अमित पाटील यांनी केली. विश्वस्तांच्यावतीने पुनर्नियुक्त अध्यक्ष अशोक जैन यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. अशोक जैन यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पद्मालय तीर्थस्थळांस महाराष्ट्र शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत नुकताच राज्य शासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला. 1 जुलै 2018 रोजी पहिल्यांदा गणपती मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळात निवड करण्यात आलेली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही सभा बोलवण्यात आली होती. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. पद्मालयाच्या विकासासाठी भक्कम नेतृत्वाची आवश्यकता असून त्यासाठी अशोक जैन यांची अध्यक्ष म्हणून फेरनिवड करावी, असा ठराव विश्वस्त अमित पाटील यांनी मांडला. त्यास सर्व विश्वस्तांनी एकमताने मंजुरी दिली. त्यास भिका लक्ष्मण पाटील यांच्यासह सर्व विश्वस्तांनी अनुमोदन दिले.संस्थानचे माजी अध्यक्ष अर्जुन पाटील, आनंदराव पाटील, अमृत कोळी, गोकुळ देशमुख, शिरीष बर्वे, डॉ. पी.जी. पिंगळे, गणेश वैद्य आदी विश्वस्त, अशोक पाटील-डोणगावकर उपस्थित होते.
देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होणार -अशोक जैन
पर्यटकास पद्मालयाचे पौराणिक महत्त्व चित्र व म्युरल प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसेल असे नियोजन आहे. या संस्थानला ‘ब’ दर्जा मिळाल्यामुळे नियोजित कामांना वेग येऊन मंदिर आणि परिसराचा विकास होईल. या संस्थानचा सर्वतोपरी विकास साध्य करण्याचा संकल्प विश्वस्तमंडळाने घेतला आहे. भारतवर्षात या देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होईल, अशी खात्री आहे, असे पुनर्निवड झालेले अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.