श्री क्षेत्र पद्मालयला अंगारकी चतुर्थीला भाविकांची अलोट गर्दी

एरंडोल : नववर्षात एकच अंगारिका चतुर्थी असल्यामुळे श्रीक्षेत्र पद्मालय येथे भाविकांची अलोट गर्दी झाली. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी “श्री गणेश  दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास धर्मदाय उपायुक्त गाडे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. यावेळी श्री गणपती मंदिर देवस्थानचे विश्वस्त ऍड. आनंदराव पाटील यांच्या हस्ते गाडे यांचे स्वागत करण्यात आले.
महापूजेनंतर ५ वाजेच्या सुमारास भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. सकाळी ९.३० नंतर प्रचंड गर्दी उसळली. दर्शन बारी पूर्ण भरून बाहेर वनखात्याच्या विश्रांती गृहापर्यंत भाविकांची रांग लागली होती. एका रांगेत सुमारे चार ते पाच हजार भाविक उभे असल्याचे सांगण्यात आले. तसेच दुपारी २.३० वाजेपासून भाविकांची प्रचंड गर्दी वाढली. रात्री शेवटचा भाविक येईल तोपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील असे विश्वस्थानकडून सांगण्यात आले.
दिवसभर भाविकांसाठी फराळ, केळी, चहापान सुविधा पुरविण्यात आली. तसेच कासोदा व तळई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. या मोफत उपचार शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. कुरूप चेहऱ्यावरचे मस, काळे, डाग अंगावरील गाठी व गोंदलेले मिटवण्यासह अनेक आजारांवर यावेळी मोफत उपचार करण्यात आले. जवळपास ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
ज्येष्ठ नागरिकांसाठी तात्काळ दर्शनाची सोय करून देण्यात आली. एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यात्रा उत्सव शांततेत पार पडला. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. एरंडोल पाचोरा जळगाव बस आगारांतर्फे खास बस गाड्या सोडण्यात आल्या होत्या. अंगारिका चतुर्थी निमित्त भरलेल्या यात्रा उत्सवात यशस्वी करण्यासाठी गणपती देवस्थानचे विश्वस्त एडवोकेट आनंदराव पाटील, ए एल पाटील, अमित पाटील, भिका महाजन, डॉक्टर पांडुरंग पिवळे, गोकुळ देशमुख, राजेश तिवारी यांनी परिश्रम घेतले. ‌