श्रीलंकन नौदलचा भारतीय मच्छिमारांवर गोळीबार, पाच जण गंभीर जखमी

Sri Lankan Nav: मंगळवारी सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ  श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय मच्छीमार जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर इतर तीन मच्छीमारांना किरकोळ दुखापत झाली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना बोलावून या कारवाईचा औपचारिक निषेध व्यक्त केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, ‘आज सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ १३ भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाने गोळीबार केला. यामध्‍ये पाच भारतीय मच्छीमार जखमी झाले असून, यातील दाेघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जाफना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाफना येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जखमी मच्छिमारांची भेट घेतली.

हेही वाचा : जि.प. कर्मचाऱ्याची राहत्या घरात आत्महत्या, तीन जण ताब्यात

तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील १३ मच्छिमारांना अटक करत असताना गोळीबार करण्यात आला. त्यापैकी पाच जण जखमी असून दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जाफना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर तिघांवर किरकोळ उपचार करण्यात आले आहेत. इतर मच्छिमारांना अटक झाली आहे.

भारतीय मच्छिमारांनी मासेमारीसाठी चुकून आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडल्यानंतर डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने मच्छिमारांना ताब्यात घेतले. याशिवाय मच्छिमारांची बोटही नौदलाने जप्त केली, अशी बातमी पीटीआयने दिली आहे.

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी एका निवेदनाद्वारे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती केली आहे की, त्यांनी श्रीलंकेच्या सरकारशी समन्वय साधून सर्वच्या सर्व मच्छिमारांना सोडवून आणण्याची भूमिका घ्यावी. रंगास्वामी यांनी पुढे म्हटले की, १३ मच्छिमारांपैकी सहा जण हे पुद्दुचेरीच्या कराइकल येथील असून सात जण तामिळनाडूमधील आहेत.