St BusTicket Price : नववर्षात लालपरीचा प्रवास महागणार ? एसटी महामंडळाने सादर केला भाडेवाढीचा प्रस्ताव

एसटी महामंडळाच्या खर्चामध्ये सतत होणारी वाढ लक्षात घेता, कर्मचारी वेतन, इंधनाचे वाढते दर, तसेच टायर आणि सुट्या भागांच्या किंमती यामध्ये झालेली वाढ या पार्श्वभूमीवर, २०२१ पासून प्रलंबित असलेल्या एसटीच्या तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाच्या तिकीट दरांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे, कारण सतत वाढणाऱ्या खर्चामुळे महामंडळावर आर्थिक ताण वाढत चालला आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी सेवा टिकवून ठेवण्यासाठी आणि महामंडळाचे अर्थसंकट दूर करण्यासाठी तिकीट भाडेवाढ ही अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एसटी महामंडळाची ७६ वर्षांची सेवा,  प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा पुरवणारे एसटी महामंडळ गेली ७६ वर्षे जनतेच्या सेवेत कार्यरत आहे. प्रवासादरम्यान होणारे अपघात कमी करण्यासाठी महामंडळाने त्रिसूत्री योजना आखली आहे.

या योजनेत चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे, तसेच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बस उपलब्ध करून देणे यावर भर दिला जात आहे.

“प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय आहे,” असेही एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी सांगितले. महामंडळाचा हा सकारात्मक दृष्टिकोन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक आश्वासक पाऊल ठरेल.