जळगाव : येथे विभागीय कार्यशाळा व जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी आक्रोश आंदोलन केले. याप्रसंगी सर्व संघटनांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी लाल ध्वज फडकवून सरकारला अंतिम इशारा देण्यात आला.
आक्रोश आंदोलन दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे यासाठी जागे व्हा जागे व्हा मायबाप सरकार जागे व्हा अशा घोषणा देण्यात आल्या. प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करण्याचे काम महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी रात्रंदिवस करीत असताना देखील कर्मचाऱ्यांवरील अन्याय बंद झाला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आक्रोश करण्यात आला. विविध खात्यांची पगार वाढ झाल्यानंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांशी दुजाभाव करण्यात येत असल्यामुळे उद्या मंगळवारी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी महाराष्ट्र सरकारच जबाबदार असेल असा इशारा देखील देण्यात आला.
आज कर्मचाऱ्यांकडून प्रचंड आक्रोश करण्यात आला. तरी देखील प्रशासनाने दखल न घेतल्यास मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे संयोजक गोपाळ पाटील यांनी दिली.
आगामी काळ अत्यंत महत्त्वाचा असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली एकजूटता कायम ठेवून आपला हक्क मागून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सोपान सपकाळे यांनी केले. रा. प. कामगार प्रलंबित आर्थिक प्रश्नांच्या मागण्याबाबत राज्य शासनाकडून वेळकाढू पणा होत असल्याबाबत कैलास सोनवणे यांनी निषेधाचा ठराव ठेवला.
यावेळी कार्यशाळेच्या गेटवर आकाश राजपूत, गोपाळ पाटील, लीलाधर चौधरी, प्रशांत चौधरी, मोहन बिडकर, विलास सोनवणे, योगेश सपकाळे, गोकुळ पाटील, सुरेश जैस्वाल, धीरज चोपडे तर जळगाव आगारात संदीप सूर्यवंशी, दगडू सोनवणे, दिनेश पाटील, गणेश बडगुजर, पदाधिकारी व कर्मचारी यांनी सरकार विरुद्ध आक्रोश व्यक्त केला.