प्रत्येक बँकेत केवायसी कक्ष सुरू करा : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी

जळगाव : जळगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानी पोटी शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान मंजुर करण्यात आले आहे. मात्र, त्यांना बँक खात्यात केवायसी करणे बंधनकारक आहे. याकरिता तालुक्यातील प्रत्येक बँकेत केवायसी कक्ष सुरु करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. यासंदर्भाचे निवेदन जळगाव तहसीलदार यांना मंगळवारी देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने दिलेल्या निवेदनाचा आशय असा आहे की, नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानी पोटी जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान मंजुर करण्यात आले आहे. याचा जळगाव तालुक्यातील २ हजार ४३६ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मात्र, ४८२ शेतकरी बांधव यांनी अद्याप बँक खात्यात केवायसी प्रक्रिया न केल्यामुळे त्यांची अनुदानाची रक्कम परत जाऊ शकते. त्याकरिता तालुक्यातील सर्व बँकांमध्ये तातडीने केवायसी कक्ष सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे. दरम्यान, लाभार्थी शेतकऱ्यांची यादी व केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करावी व तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदान परत जाणार नाही याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.