तरुण भारत लाईव्ह न्यूज ।3 डिसेंबर २०२२ । एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी तथा समीक्षक प्रा. वा. ना.आंधळे यांची 25 डिसेंबर 2022 रोजी नाशिक येथे होणार्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या संमेलनाचे आयोजन वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीने केले आहे. आघाडीचे अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ.अनिल सांगळे मुंबई यांनी प्रा.आंधळे यांच्या नावाची घोषणा केली.
हे संमेलन एकदिवसीय असून क्रांतिवीर व्ही.एन.नाईक शिक्षण प्रसारक संस्था डोंगरे वसतीगृह कॅनडा कॉर्नर, नाशिकच्या पटांगणावर होईल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत आंधळे असून, सुप्रसिद्ध कादंबरीकार बाबाराव मुसळे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. संमेलनास राज्यभरातील मान्यवर साहित्यिक उपस्थित राहतील.
प्रा.आंधळे हे धरणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गेली 35 वर्षे मराठी या विषयाचे अध्यापन करीत होते. चार दशकांपासून त्यांचे साहित्य लेखन सुरू असून त्यांचे नावावर ‘फर्मान’, ‘गुलमोहर’, ‘स्पंदन’, ‘फर्मान आणि इतर कविता’ ही काव्यसंपदा असून ’शब्दशिवार : जाणिवेच्या लेखणीतून’ हा समीक्षाग्रंथ आहे. प्रा.आंधळे यांच्या ’फर्मान आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहावर महाराष्ट्रातल्या 40 नामवंत समीक्षकांनी समीक्षा केली आहे.
प्रा.डॉ.तुषार चांदवडकर (चांदवड) यांनी ’फर्मान आणि इतर कविता : आशय आणि आस्वाद’ या शीर्षकाने सदर ग्रंथ संपादित केला आहे. तसेच प्रा.आंधळे यांच्या ’फर्मान’ या काव्यसंग्रहाचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाले असून त्यांच्या मराठी कविता शालेय अभ्यासक्रमापासून विविध विद्यापीठीय अभ्यासक्रमात अभ्यासल्या जात आहे.
’लेक वाचवा अभियानात’ प्रा. आंधळे यांच्या कवितेचे मोठे देदीप्यमान योगदान असून त्यांची ’आई, मला जन्म घेऊ दे!’ ही समाज प्रबोधनपर कविता इंग्रजीसह 45 भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. साहित्य आणि समाज ह्या घटकांवर आधारीत आजवर त्यांची चारशेच्यावर व्याख्याने महाराष्ट्रभर झाली आहेत. दूरदर्शन मालिका शीर्षकगीत लेखन, दिवाळी अंकाचे संपादन, चार राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कविसंमेलाचे अध्यक्षपद, विविध सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक पुरस्कार या प्रकारचे यश त्यांनी संपादित केले आहे. संमेलनाध्यक्षाचा होणारा हा सन्मान खान्देशच्या साहित्यिकांसाठी व रसिकांसाठी अभिमानास्पद आहे. प्रा.आंधळे यांच्या या निवडीबद्दल खान्देशातील शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.