रावेर : येथे सावत्र बापाने तीन वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे या हत्याकांडांत तिची सख्खी आई देखील सहभागी आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या सावत्र बापासह सख्ख्या आईला अटक केली असून खुनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. माधुरी घेटे व अजय घेटे अशी मुलीच्या आई वडिलांचे नाव आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील रहिवाशी माधुरी घेटे हीचा वारोली येथील भारत मसाने यांच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. माधुरीला पहिल्या पतीपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र, पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बिलासवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी लग्न केले होते. तेव्हापासूनही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती. 31 मे रोजी अजय याने तीन वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले तसेच गळा आवळल्याने ती मयत झाली. ही घटना अजयची पत्नी माधुरी माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा उद्देशाने मुलीचा मृतदेह पती-पत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला. मात्र, यावेळी माधुरीचा पहिला पति व मुलीचा सख्खा बाप भरत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले. पियुष्याला विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारले असे सांगितले. म्हसाने याला मुलीच्या गळ्याजवळ निशाण दिसून आल्याने त्याने अंतुर्ली पोलीस चौकीत मुलीला नेले. पोलिसांनी तेथून मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णाण्यात पाठवले असता तपासणीअंती मुलीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मुलीचे शवविच्छेदन केल्यावर गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने रावेर पोलिसांनी मुलीची सख्खी आई व सावत्र बाप या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान खुनाचे कारण समजू शकले नसून सहायक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ तपास करीत आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.