Stock market : भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक; बाजार मूल्यात झाली घट

शेअर बाजार : मंगळवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक ठरले आहे. सेबी प्रमुखांच्या वक्तव्यानंतर आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये जोरदार विक्री दिसून आली. सरकारी बँका आणि सरकारी पीएसयू शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली झाली त्यामुळे बाजाराचा मूड बिघडला. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 165 अंकांच्या उसळीसह 73,667 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी केवळ 3 अंकांच्या वाढीसह 22,335 अंकांवर बंद झाला.

बाजार मूल्यात घट

भारतीय शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात बंद झाले. परंतु मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे बीएसईवर सूचीबद्ध समभागांच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजार मूल्य 385.57 लाख कोटी रुपयांवर घसरले जे मागील सत्रात 389.60 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 4.03 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.