Stock market : शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद! टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजारपेठेत भीती

Stock market : देशांतर्गत शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली.  यामागील कारण म्हणजे अमेरिकेने सुरू केलेले टॅरिफ वॉर. आजच्या व्यवहारांती निफ्टी १२१ अंकांनी घसरून २३,३६१ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ३१९ अंकांनी घसरून ७७,१८६ वर बंद झाला, तर बँक निफ्टी २९६ अंकांनी घसरून ४९,२१० वर बंद झाला. निफ्टी मिडकॅपमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे.

दिवसभराच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स सुमारे ७०० अंकांनी घसरला. निफ्टी देखील २३,३०० च्या खाली आला. मिड आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. रुपया ८७.०४/$ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला.

ग्राहकोपयोगी वस्तू आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील वाढ वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक खाली आले. सर्वात मोठी घसरण धातू निर्देशांक आणि तेल आणि वायू निर्देशांकात झाली. निफ्टी मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉम निर्देशांक देखील मोठ्या तोट्यात होता.

कोणते शेअर्स घसरले ?
निफ्टीवर L&T,, ONGC,Tata Consumer,Coal India,Hindalco, BEL, LT, Tata Steel, Tata Motors या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली आहे. 

कोणते शेअर्स वधारले ?
निफ्टीवर Bajaj Finance, M&M, Wipro, Shriram Finance, Maruti, Sun Pharma, Titan, Eicher Motors, Nestle India या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजारपेठेत मोठी भीती पसरली आहे. सकाळी, गिफ्ट निफ्टीमध्येही २०० अंकांची मोठी घसरण झाली. निक्कीमध्येही ९०० अंकांची घसरण झाली. सुरुवातीपासूनच घसरणीची चिन्हे दिसत होती. चलन बाजारात रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

जागतिक बाजारपेठेतील अपडेट
टॅरिफ वॉरमुळे डाओ आणि नॅस्डॅक फ्युचर्समध्ये ५०० अंकांची घसरण झाली आहे. अमेरिकेने चीनवर १० टक्के आणि मेक्सिको आणि कॅनडावर २५ टक्के टॅरिफ लादला आहे. मेक्सिको आणि कॅनडानेही त्या बदल्यात अमेरिकेवर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. डॉलर निर्देशांकात एक टक्का वाढ झाल्यामुळे सोने १० डॉलरने घसरून २८२५ डॉलरच्या जवळ पोहोचले आणि चांदीवर १.२५ टक्क्यांचा दबाव दिसून आला.