Stock Market Crash : आज ७ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आजच्या व्यवहारांती सेन्सेक्स २,२२६ अंकांनी घसरून ७३,१३७.९० वर बंद झाला. निफ्टी ७४२.८५ अंकांनी घसरून २२,१६१.६० वर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे १३.५ लाख कोटी रुपयांची घट झाली.
जागतिक व्यापार युद्धाची वाढती भीती आणि अमेरिकेत मंदीची शक्यता यामुळे आज भारतीय बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणा आणि त्यावर चीनने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे बाजारात घबराट निर्माण झाली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्येही मोठी घसरण असून बीएसई मिडकॅप इंडेक्स ३.४६ टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स ४.१६ टक्क्यांनी घसरला. सर्व क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंगात बंद झाले. धातू, रिअॅलिटी, आयटी आणि भांडवली वस्तूंच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 4,225 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 576 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर 3,505 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
तर 144 शेअर्स कोणतीही हालचाल न करता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 59 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 775 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.
गुंतवणूकदारांना १३.४२ लाख कोटी रुपयांचे नुकसान
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ७ एप्रिल रोजी ३८९.९२ लाख कोटी रुपयांवर घसरले, जे मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवार, ४ एप्रिल रोजी ४०३.३४ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे १३.४२ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.