Stock Market Opening: शेअर बाजरात पुन्हा घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपये स्वाहा

Stock Market: सोमवारी (२७ जानेवारी) देशांतर्गत शेअर बाजार घसरणीने सुरू झाले. निफ्टी २३,००० च्या खाली घसरताना दिसला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी १६१ अंकांनी घसरून २२,९३० च्या आसपास व्यवहार करत होता. सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरून ७५,६३९ वर व्यवहार करत होता. बँक निफ्टीमध्ये सुमारे ४६० अंकांची घसरण दिसून आली आणि निर्देशांक ४७,९१० च्या आसपास होता.

मिडकॅपमध्ये ९०० अंकांची आणि स्मॉलकॅपमध्ये ५५० अंकांची मोठी घसरण झाली. इंडिया VIX मध्ये ६% वाढ झाली. रिअॅल्टी वगळता जवळजवळ सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीत होते. परंतु आयटी आणि धातू निर्देशांकांमध्ये सर्वात जास्त तोटा दिसून आला.

निफ्टीच्या सुरुवातीसह ब्रिटानिया आणि डॉ. रेड्डीजमध्ये वाढ झाली. यानंतर, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट देखील वाढले. उर्वरित बीईएल, श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, टाटा मोटर्समध्ये घसरण झाली. सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी फक्त ५ शेअर्स हिरव्या रंगात होते, ज्यामध्ये FMCG स्टॉक्स आणि ICICI बँक, एशियन पेंट सारखे स्टॉक्स समाविष्ट होते.

आठवड्याच्या पहिल्याच सत्रात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारातील सततच्या घसरणीमुळे बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 413.35 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या सत्रात 419.51 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच गुंतवणूकदारांचे 6.16 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जागतिक संकेत
आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत कमकुवत दिसत आहेत. प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. याआधी शुक्रवारी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले. तर सोमवारी सकाळी अमेरिकन फ्युचर्सवर दबाव होता. शुक्रवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 141 अंकांनी घसरला आणि 44424.25 च्या पातळीवर बंद झाला.

NASDAQ Composite 99 अंकांनी घसरला आणि 19,954.30 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांकात 17 अंकांची घसरण दिसून आली आणि तो 6101.24 च्या पातळीवर बंद झाला.