आठवड्यातील दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात मंगळवारी( 17 डिसेंबर) रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 900 अंकांनी तर निफ्टी 279 अंकांची घसरन झाली आहे.
यूएस फेडरल रिझर्व्हची बैठक
जगभरातील शेअर बाजार अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारही खबरदारी घेत आहेत.
25 बेसिस पॉइंट्सची व्याजदर कपात कमी होईल, असा विश्वास बाजाराला वाटत आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्यावर आहेत. जर त्यांनी बाजारासाठी अनुकूल भाषण केले नाही, तर घसरणी आणखी वाढू शकते.
रुपया कमकुवत
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सातत्याने कमकुवत होत आहे. मंगळवारी तो 84.92 रुपयांच्या नवीन सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये भारताची व्यापार तूट 37.8 अब्ज डॉलरने वाढली आहे.
यामुळेही रुपयावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. आयटी आणि फार्मा सारख्या निर्यातदारांना रुपयाच्या घसरणीचा फायदा होईल. तसेच आयातदारांसाठी आयात खर्च वाढेल, ज्यामुळे त्यांच्या शेअरच्या किमतींवर परिणाम होईल.
कच्च्या तेलाची दर वाढ
गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत त्यात सुमारे 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंताही वाढत आहे.
भू-राजकीय तणाव आणि फेडरल दरापुढील अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. इराण आणि रशियावर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे क्रूडचा पुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ होत आहे.