बुधवार ( दि. १ २ मार्च ) भारतीय बाजाराची सुरुवात मोठ्या तेजीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही हिरव्या रंगात व्यवहार करतांना दिसले.
सेन्सेक्स १६८ अंकांनी वाढून ७४,२७० अंकांवर उघडला. निफ्टी-५० देखील ३९ अंकांच्या वाढीसह २२,५३६ अंकांवर उघडला. बँक निफ्टीबाबतही असेच घडले, जो ४१ अंकांनी वाढून ४७,८९४ अंकांवर उघडला.
आयटी, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक वगळता, निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आज तेजी दिसून आली. पीएसयू बँक आणि ऑटो निर्देशांकांमध्ये वाढ झाली. काल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर यू-टर्न घेतल्याच्या बातमीने आज बाजाराला चालना मिळाल्याचं चित्र आहे.
आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत कमकुवत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात आशियाई बाजारात खरेदी दिसून येत आहे. याआधी मंगळवारी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले होते. मंगळवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 478 अंकांनी घसरला आणि 41,433.48 च्या पातळीवर बंद झाला.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफबाबत सातत्याने बदलणाऱ्या निर्णयांमुळे जगभरातील बाजारपेठा गोंधळलेल्या आहेत. ट्रम्प यांनी मंगळवारी जाहीर केले की ते कॅनेडियन स्टील आणि ॲल्युमिनियमवरील शुल्क 25% वरून 50% पर्यंत वाढवतील. ट्रम्प यांचा हा निर्णय कॅनडाने घेतलेल्या निर्णयाला उत्तर देण्याचा प्रयत्न होता.
कॅनडाने अमेरिकेच्या वीज निर्यातीवर 25% अधिभार लावण्याचा निर्णय घेतला होता. काही तासांनंतर, कॅनडाने विजेवरील अधिभार मागे घेतला, तर अध्यक्ष ट्रम्प यांनीही 50% शुल्काचा निर्णय मागे घेतला आणि तो पुन्हा 25% पर्यंत कमी केला.