न्यू इयरच्या पहिल्याच दिवशी चोरी केली, पण..

जळगाव : न्यू इयरच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी ७२ हजार ९०० रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली होती. जिल्‍हापेठ पोलिसांनी आठच दिवसांत गुन्हा उघडकीस आणला आहे. अल्पवयीन संशयितासह चोरट्यांच्या म्होरक्याला अटक केली व ऐवज जप्त केला आहे.

साने गुरुजी कॉलनीतील रहिवासी हेमंत नंदलाल रंगलानी (वय ५०) यांचे चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमध्ये जय लहरी ट्रेडर्स नावाचे शेतीला लागणारे इलेक्ट्रिक मोटार यांचे दुकान आहे. शनिवारी (ता. ३१) रात्री आठनंतर दुकान बंद करून ते घरी गेले.

रविवार असल्याने दुकान बंद होते. सोमवारी (ता. २) सकाळी अकराला त्यांच्या दुकानावर काम करणारा कामगार सुरेश फेगडे यांनी फोन करून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. हेमंत रंगलानी यांनी दुकानात पाहणी केली. यामध्ये चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले.

हेमंत रंगलाणी यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती शटरचे कुलूप तोडून दोन इलेक्ट्रिक मोटर व इतर सामान, असा एकूण ७२ हजार ९०० रुपयांचे साहित्य चोरून नेले होते.

दुकान मालक हेमंत रंगलानी यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्याबाबत मिळालेल्या माहितीवरून प्रभारी अधिकारी किशोर पवार यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश देशमुख, गणेश पाटील, सलीम तडवी, जुबेर तडवी, सुधाकर पाटील यांनी अल्पवयीन साथीदारासह विशाल ऊर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (रा. पावर हाऊसजवळ, भिलाटी, तांबापुरा) याला ताब्यात घेतले.