भुसावळ : वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणाऱ्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन एके-४७ रायफल्ससह दोन अत्याधुनिक गलील रायफल्स अज्ञात चोरट्यांनी १९ ते २१ दरम्यान लांबवल्याने देशभरात खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांचा २४ तास खडा पहारा असताना हा प्रकार घडला होता. वरणगाव पोलिसांकडून व समांतर यंत्रणेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असताना जाडगाव रेल्वे लाईनवर सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तीन शस्त्र सापडल्याची घटना समोर आली.
गँगमनच्या सतर्कतेने शस्त्र सापडले
पोलीस यंत्रणेकडून रायफल चोरीचा कसोशीने तपास सुरू असताना संशयिताने प्रकरण अंगाशी येत असल्याची भीती वाटल्याने त्यांनी जाडगावनजीक रेल्वे रूळावर शस्त्र आणून टाकले नाही ना? असादेखील प्रश्न आहे. सोमवारी सकाळी गँगमन रेल्वे रूळावर गस्त घालत असताना त्यास तीन शस्त्र रूळावर पडल्याचे दिसताच त्यांनी अभियंत्यांना व नंतर पोलीस यंत्रणेला कळवण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, वरणगावचे सहनिरीक्षक जनार्दन खंडेराव, उपनिरीक्षक सोनवणे, जावरे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत दोन एके ४७ व एक गलील रायफल जप्त केली.
हे वाचलात का? ५३ लाखांच्या गांजासह एकाला बेड्या शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई
दोन शस्त्र अद्यापही गायब दोन संशयितांची यंत्रणेकडून कसून चौकशी
यंत्रणेला तीन शस्त्र सापडली असलीतरी अद्यापही दोन शस्त्र मात्र बेपत्ताच असल्याने या प्रकरणात गुढ वाढले आहे. २४ तास सुरक्षा तैनात असताना बंदीस्त भागातून शस्त्र चोरीला गेल्याने अनेक बाबी उपस्थित होत आहेत. श्वान पथकाला पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र काही अंतरावर पूल व पाणी असल्याने श्वान थांबले तर दोन संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा या प्रकरणात सहभाग आहे वा नाही? हे खोलवर चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.