नागपूर : राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे. नागपुरातही औरंगजेबाची कबर हटविण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. नागपूरच्या महल परिसरात दोन गट आमने-सामने आल्यानंतर वाद पेटला आहे. या वादात जमावाने दगडफेक, जाळपोळ आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे. पोलिसांनी जमावाला शांत करण्यासाठी बळाचा वापर केला.
छत्रपती संभाजी नगर येथील औरंगजेबाची कबर हटवावी, या मागणीसाठी सोमवारी नागपुरात हिंदू संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून, हा माेर्चा काढण्यात आला हाेता. मात्र, माेर्चा महल परिसरात आल्यानंतर काही युवकांनी चाैकात एकत्र येऊन औरंगजेबाचे महिमामंडन करणाèया घाेषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन गट समोरासमोर भिडले. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी २० तरुणांना ताब्यात घेतले.
सायंकाळच्या सुमारास महालातील चिटणीस पार्क, तसेच गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या. यामुळे मोठा जमाव परिसरात जमला. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली. तसेच वाहनांची जाळपोळ सुद्धा करण्यात आली. यात दोन पोलिसांचे कपडेदेखील फाटले. काही समाजकंटकांनी रस्त्यांवरील वाहनांना आग लावली.
नागपूरकरांनी शांतता बाळगावी- गडकरी यांचे आवाहन
नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्देवी असून, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. काही लोकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. हे चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर कारवाई करण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे. जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई करावी. मी सर्वांना आवाहन करतो की नागपूरची शांतता बिघडू देऊ नका. जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.