नंदुरबार : शहरात ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकी गुरुवार, १९ रोजी अचानक दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. या वादाचे पर्यवसन दगडफेकीत होऊन पोलीस व पोलीस वाहनांना लक्ष करण्यात आले. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराचा वापर करावा लागला. हा प्रकार दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला.
नंदुरबार शहरात ईद-ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त हजारो जणांचा जमाव रस्त्यावर उतरलेला होता. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे दगडफेक झाली. खबदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक एस. श्रवण दत्त यांनी नंदुरबार शहरात कडक बंदोबस्त लावला होता. परंतु , दुपारी अचानक दगडफेक सुरु होऊन पोलीस व पोलिसांच्या वाहनांना लक्ष करण्यात आले. यात पोलिसांच्या वाहनांचे नुकसान होऊन काही पोलीस जखमी झाल्याचे बोललं जातं आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठ देखील लक्ष बनवण्यात आल्यामुळे अवघ्या काही मिनिटात संपूर्ण शहर बंद पडले. दक्षता म्हणून शाळा बंद करून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. माळीवाडा, सोनार, खुंट, तेली गल्ली, काळी मशीद परिसर अशा प्रमुख ठिकाणी काही दुकानांचे व काही घरांचे नुकसान झाले. तसेच जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर पोलिसांना करावा लागल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. अद्याप तणाव कायम असून पोलीस दल नियंत्रण मिळवून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. पाचनंतर परिस्थिती नियंत्रित आली.