जळगाव : मोहाडी येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन भिलाभाऊ सोनवणे आणि त्यांचे बंधू मोहाडीचे सरपंच धनंजय सोनवणे यांच्या घरावर दगडफेक करत घर व वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्यात आली होती. याप्रकारणी शनिवारी एमआयडीसी पोलिसांत ९ जणांविरोधात धनंजय सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. यात आकाश बबन हटकर (वय २६) व अंकुश पुंडिलक हटकर (वय ३३) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादीनुसार, काशिनाथ गवळी यांना जुन्या भांडणावरुन दीपक हटकर, सागर हटकर, अंकुश हटकर हे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मारहाण करीत असल्याचा निरोप आला. गावाचा सरपंच असल्याने घटनास्थळी गेलो असता तिघे गवळी यांना मारहाण करीत होते. मी, सागर संजय सोनवणे, शशिकांत सोनवणे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आम्हालाही शिवीगाळ केल्याने आम्ही तेथून निघून गेलो. दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजता शहरातील मोहाडी रोडवरील गुरु पेट्रोलपंपाच्या समोरील ईम्पेरीयल अपार्टमेंटच्या खाली सागर संजय सोनवणे, शशीकांत लक्ष्मण सोनवणे असे बोलत असतांना त्यावेळी तेथे राजु हटकर, अंकुश हटकर, गोलू हटकर, महेंद्र हटकर, सागर हटकर, दिपक हटकर, भरत हटकर, अर्जुन हटकर, आकाश हटकर हे हातात लाठ्याकाठ्या घेवून तेथे आले आणि अचानक सर्वांना मारहाण करायला लागले. यावेळी धनंजय सोनवणे हे बचावसाठी घरात गेले असता फ्लॅटवर दगडफेक करुन खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच बाहेर कारच्या काचाही फोडल्या. पोलीस घटनास्थळी येताच सर्वांनी तेथून पळ काढला, असे फिर्यादीत नमूद आहे. या गुन्ह्यात दोघांना अटक झाली आहे तर अन्य संशयितांचा शोध सुरु असल्याची माहिती तपासाधिकारी संजय पाटील यांनी दिली