जळगाव : मे महिन्यात ४८ अंशांपर्यंत अति तापमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात या वर्षी बेमोसमी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात सुमारे १० हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतपिकांचे नुकसान झाले आहे, तर शुक्रवारी आणि रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यांसह बेमोसमी पावसाने सुमारे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.
यंदा मे महिन्याच्या दुसय्या आठवड्यात वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. प्रचंड उकाडा जाणवणाऱ्या या मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. जळगाव शहरात रविवारीदेखील सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला.
जळगावला पुन्हा झोडपले
जळगाव शहरासह लगतच्या काही गावांमध्ये रविवारी सायंकाळी वादळाला सुरुवात झाली. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह सायंकाळी ७.३० वा. मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. पावसामुळे गारव्याने जळगावकरांना दिलासा मिळाला.
वृक्ष उन्मळून पडले, बत्ती गुल
वादळी पावसामुळे शहरातील बहुतांश भागांत पुन्हा वृक्ष उन्मळून पडले. तसेच विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.