Jalgaon News : मनपाचा अजब कारभार; झोपडपट्टीधारकांना आली चक्क ४० हजारांपर्यंत घरपट्टी

जळगाव : शहरातील तांबापुरा, फुकटपुरा, पंचशील नगर परिसरात नाल्याचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेले असताना त्यांना कोणाकडूनही कोणत्याही स्वरूपात मदत देण्यात आली नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. त्यातच महापालिका प्रशासनाने त्यांना १५ हजार ते ४० हजारांची घरपट्टी व पाणीपट्टीचे बील पाठविल्याचा अजब प्रकार घडला आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ही घरपट्टी व पाणीपट्टी दोन वर्षांसाठी माफ करण्यात यावी, या मागणीसाठी झोपडपट्टीधारकांनी महापालिकेवर मंगळवारी धडक मारली. यासंदर्भांतील निवेदन महापौर जयश्री महाजन व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले.

नाल्याचे पाणी घरात
नाल्याचे पाणी घरात शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आमचा महापौरांचा वॉर्ड असून देखील आमच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. मोलमजुरी करून जीवन जगत असताना जी घरपट्टी-पाणीपट्टी प्रत्येकी १ हजार ते २ हजार येत असताना यावर्षी अव्वाचे सव्वा बील महापालिकेकडून आकारण्यात आले आहे. यात १० ते ४० हजारांचे बील या झोपडपट्टीवासीयांना महापालिकेतर्फे वितरीत करण्यात आले आहे. ही घरपट्टी व पाणीपट्टी दोन वर्षांसाठी माफ करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागणी मान्य न झाल्यास महापालिकेवर भव्य मोर्चा आणण्यात येईल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. निवेदन देताना विकारखान, अरशदशेख, नियाजोद्दीन, रेश्मा बोरसे, गीता मोची, सुलतानाबी, राधा मोची, सरला शिंदे, असलम कुरेशी आदी उपस्थित होते.

https://youtu.be/mARR1EoEit0

(बातमी अपडेट होत आहे)