जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना गुड न्यूज मिळण्याची शक्यता ; पाहा काय म्हणाले पालकमंत्री

जळगाव : जिल्ह्यातील उद्योगांना आवश्यक त्या परवानग्या एकाच छताखाली प्राप्त व्हाव्यात म्हणून 21 कोटी रुपये एवढा निधी ‘उद्योग भवन’ साठी शासनाने मंजूर केला असून त्यात उद्योग व्यवसायाशी संबंधित आस्थापनाचे कार्यालय असतील असे हे सुसज्ज उद्योग भवन येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असून जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना मराठवाडा व विदर्भाच्या धर्तीवर वीज आणि जीएसटी मध्ये सवलत मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यामुळे पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यास उद्योजकांना दिलासा मिळणार आहे.

‘इग्नाइट महाराष्ट्र -2024’ ही जळगाव जिल्ह्यातील उद्योजक, नव उद्योजक, उद्योगोत्सुकांसाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली, त्याच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उद्योग विभागाचे नाशिक विभागीय सह संचालक सतीश शेळके, मैत्रीचे नोडल ऑफिसर  उन्मेष महाजन, यांच्यासह विविध बँकाचे व्यवस्थापक, उद्योजक उपस्थित होते.

पालकमंत्री यांनी सांगितले की, चाळीसगाव, पाचोरा, व चोपडा येथील ग्रामीण भागातील सहकारी औद्योगिक वसाहतींना पायभूत सुविधासाठी 8 कोटी 71 लाख रुपयाचा निधी शासनाने दिला आहे हे सांगून जिल्ह्यात किमान चार ते पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शासनाच्या उद्योग विभागातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना शहरी व ग्रामीण भागातील नव उद्योजकांना भरीव अनुदान देण्यात येत असून यातून जिल्ह्यात दरवर्षी एक हजार नवीन उद्योगांची उभारणी होईल ज्यातून जिल्ह्याला किमान तीन हजार युवकांना नवीन रोजगार निर्माण होतील असा शासनाचा प्रयत्न असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते 17 ऑगस्टला

महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून पात्र बहिणींना 17 ऑगस्टला त्यांच्या खात्यात आमच्या शासनाकडून 2 हप्ते दिले जाणार आहेत.ती राखी पौर्णिमेची बहिणींना आम्ही दिलेली ओवाळणी असेल असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावांनाही सोडले नसून त्यांच्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ सुरु केली आहे. त्यात 12 वी पास झालेल्यांना 6 हजार, आय. टी. आय, पदविका असणाऱ्यांना 8 हजार तर पदवीधर, पदव्युत्तर असणाऱ्या युवकांना 10 हजार रुपये दिले जाणार आहे. या युवकांना विविध आस्थापनेत प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. आपण त्यांना कामासाठी, कौशल्य शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

विमानसेवा सुरु; उद्योगांसाठी पूरक

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे आणि रात्री विमान उड्डाणासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक सोयीसाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला त्यामुळे जळगाव वरून आता मुंबई, पुणे, हैद्राबाद, गोवा येथे विमान सेवा सुरु झाली आहे. उद्योजकांना उद्योगवाढीसाठी अत्यंत पूरक ठरत असल्याचे सांगून जिल्ह्यातील युवकांनी आता अधिकाधिक उद्योग उभारून रोजगार देणारे बनले पाहिजे त्यासाठी शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी असेल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी, जिल्ह्याचे सकल उत्पन्न ( जीडीपी ) वाढीसाठी कोणत्या  गोष्टी करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हा प्रशासन त्यासाठी काय काय करत असल्याची माहिती दिली.

यानंतर वेगवेगळ्या सत्रात ‘मैत्री’ चे नोडल ऑफिसर उन्मेष महाजन, आय.डी. बी. आयचे मिलिंद काळे, न्यू इंडिया इन्शुरन्सचे मुख्य व्यवस्थापक ( बिझनेस ) आनंद अमृतकर, पोस्ट विभागाचे सहायक अधिक्षक  एम. एस. जगदाळे, सिद्धेश्वर मुंडे, कौशल्य विकास अधिकारी मिलिंद देशपांडे, पूजा पाटील यांनी मार्गदर्शन केलं. जिल्हा उद्योग केंद्राचे मुख्य व्यवस्थापक चेतन पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.