Nandubar News : एसटी वेळेवर येईना; विद्यार्थी घरी लवकर पोहोचेना; रजाळे येथील विद्यार्थ्यांचे हाल

नंदुरबार : शहरातील विविध महाविद्यालय व शाळेत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस वेळेवर येत नसल्याने मोठी कसरत करावी लागतेय. परिणामी विद्यार्थी शाळेत उशीरा, अथवा घरी रात्री पोहोचत आहेत. रजाळे येथील विद्यार्थी चक्क रात्री 8.30 वाजता घरी पोहचल्याचा प्रकार समोर आला असून, रजाळेेच्या ग्रामस्थांनी संबंधित आगार व्यवस्थापकांची भेट घेत, निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसची मागणी केलीय.

नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी.महामंडळाची लालपरी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र एसटी बस वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा खासगी वाहनाने शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून जावे लागत आहे. तर बर्‍यादचा कोणतेच वाहन मिळत नसल्याने घरीच थांबावे लागत आहे. तसेच सायंकाळी 5 वाजेनंतर शाळा सुटल्यावर 5.30 वाजेला वेळनुसार बस लावण्यात यावी, बर्‍याचदा बसस्थानकात वेळेवर बस लागत नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज घरी येण्यासाठी उशिर लागत आहे.

अशात 6 ऑगस्ट रोजी बसस्थानकातून सायंकाळी 7.30 वाजेला बस रवाना करण्यात आल्यानंतर रात्री 8 ते 8.30 वाजेला विद्यार्थी-विद्यार्थीनी घरी पोहचल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 7 ऑगस्ट रोजी आगार प्रमुख संदिप निकम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर सरपंच राजु मराठे, भटु मराठे, हरबनसिंग गिरासे, वासुदेव गिरासे, ज्ञानेश्वर मराठे, महेंद्र गिरासे, विशाल मराठे, मुकेश मराठे, राकेश पांगारे व हिरालाल मराठे आदी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे अश्रु अनावर
बस लागत नसल्याने विद्यार्थीनींना बसस्थानकातच अश्रु अनावर झाले. नंदुरबार येथील बसस्थानकात दि.6 ऑगस्ट रोजी दैनंदिनची जाणारी बस वेळेत लागत नसल्याने विद्यार्थी-विद्यार्थीनी आगारात उशिर होत असल्याने संबंधितांना विनंती करीत होते. मात्र विद्यार्थ्यांना वेगळेच उत्तर मिळाले. बस लागणार नाही असे सांगितल्यानंतर विद्यार्थीनींना अश्रू अनावर झाले. यादरम्यान एकलव्य शाळेच्या वर्गशिक्षकांना ही बाब सांगितल्यानंतर शिक्षक नंदुरबार बसस्थानकात आल्यावर त्यांनी विणवण्या केल्यानंतर रजाळे व पुढे जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बस देण्यात आली.

बस व्यवस्थापकांचे आश्वासन
नंदुरबार बस आगाराचे व्यवस्थापक संदिप निकम यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले की, रजाळे गावासाठी वेळेवर बस सोडण्यात येईल. बस 5.30 वाजेला लावण्यात येते परंतु काही विद्यार्थी राहून जात असल्याने अनेकदा तीदेखील तक्रार येत होती. आता ग्रामस्थांच्या मागणीवरून वेळेत बस सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.