विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी…

– अमोल पुसदकर

प्राचीन काळी भारतामध्ये गुरुकुल पद्धती होती. यामध्ये शिष्याला गुरूच्या घरी जाऊन आपले अध्ययन पूर्ण करावे लागत होते. यामध्ये शिष्याला दैनंदिन जीवन जगण्याकरिता आवश्यक असलेले सर्व प्रकारचे कौशल्य शिकविण्यात येत होते. त्याला व्यवहार ज्ञान देण्यात येत होते. जगामध्ये जी काही फसवेगिरी चालते त्यामध्ये चातुर्याने मार्ग कसा काढावा हे सांगितले जात होते. त्याचबरोबर त्याला आवश्यक ते व्यावसायिक कार्य शिकविले जात असे. परंतु, इंग्रज या देशात आल्यानंतर या देशांमध्ये एक नवीन इंग्रजी शिक्षा पद्धती अमलात आणली गेली.

हळूहळू भारतातले गुरुकुल समाप्त होत गेले आणि त्यानंतर गुरुकुल हा एक इतिहास झाला. विद्यार्थी शाळेत जाऊ लागले. तेथे त्यांना केवळ पुस्तकी शिक्षण मिळू लागले. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्यांनी काही विषय वाचलेले आहेत असे तरुण तयार व्हायचे. ज्या वेळेस प्रत्यक्ष नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी ते जात होते त्यावेळेस त्यांना पुन्हा एकदा सर्व गोष्टी शिकाव्या लागत होत्या. हळूहळू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जग हे काही पुस्तकांपुरते मर्यादित झाले. प्रत्येक व्यक्ती तिचे अंगभूत गुण घेऊन विकसित पावत असते.आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये हत्तीला झाडावर चढायला सांगितले जात आहे. सरड्याला झाडावर चढायला सांगितले जात आहे आणि गाईलासुद्धा झाडावर चढायला सांगितले जात आहे. म्हणजे तो विद्यार्थी आर्ट्सचा असेल, कॉमर्सचा असेल, सायन्सचा असेल किंवा इंजिनीअरिंगचा असेल; या सर्वच विद्यार्थ्यांची एकाच पद्धतीची परीक्षा घेण्यात येत असते. त्यामध्ये काही जण यशस्वी होतात, काही अयशस्वी होतात. काही वर्षांपूर्वी एका चाचणीत सांगितले होते की,अमेरिकेतील मुले ही भारतातील मुलांपेक्षा अधिक टीव्ही पाहतात.

या चाचणीला 15-20 वर्षे होऊन गेले असतील, परंतु आज भारतातील परिस्थिती बदललेली आहे. आज भारतातील मुले ही खेड्यातील असो की शहरातील सर्वात जास्त टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांना चिकटून बसलेली आपल्याला दिसतात. जुन्या काळातील विद्यार्थी ज्या प्रमाणात ज्ञानग्रहण करायचे, वेगवेगळे विषय शिकायचे आणि अधिक समृद्ध होत जायचे तो प्रकार आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत दिसून येत नाही. दहावी-बारावीचे विद्यार्थी असो, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असो की उच्च शिक्षण घेणारे असो; विद्यार्थ्यांमध्ये काही अंगभूत गुण असणे गरजेचे आहे. त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे मी यशस्वी झालो पाहिजे ही प्रबळ इच्छा त्यांच्यामध्ये असणे आवश्यक आहे. ही इच्छा जर असेल तर तो आवश्यक असलेले अनेकानेक प्रकारचे कौशल्य किंवा विषय शिकू शकेल. यासाठी त्याचे लक्ष अभ्यासावर केंद्रित असणे आवश्यक आहे. जर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याचे लक्ष विभागले गेले असेल तर अभ्यासासाठी फार कमी वेळ उरेल.

वेळ सर्वांना सारखा आहे; फक्त त्या वेळेचे नियोजन आपण कसे करतो, हे महत्त्वाचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे आहे त्यांनी आपल्या वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच काही आदर्श व्यक्तींची ओळख होणे आवश्यक आहे. जसे की छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप, गुरुगोविंद सिंह, मदनलाल धिंग्रा, चंद्रशेखर आझाद, स्वामी विवेकानंद. या आदर्श व्यक्तींचे जीवन, त्यांचे विचार ऐकून विद्यार्थ्यांच्या जीवनाला ध्येय मिळू शकते. ध्येयविहीनता हीच समस्या आज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. कशासाठी शिकायचे तर नोकरीसाठी. नोकरी कशासाठी तर लठ्ठ पगार मिळविण्यासाठी. परंतु, मला एक माणूस म्हणून चांगला बनायचे आहे, देशासाठी काम करायचे आहे, समाजासाठी काम करायचे आहे अशा पद्धतीची प्रेरणा ही विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनातूनच मिळू शकते. आई-वडील अनेकानेक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. यानंतरच्या गोष्टी त्यांना पुस्तके, ग्रंथ शिकवीत असतात. महापुरुषांच्या जीवनातून त्यांना जीवन जगण्याची प्रेरणा व ध्येय मिळू शकते. विद्यार्थ्यांना जर यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्यामध्ये एखाद्या गोष्टीसाठी संपूर्णपणे स्वतःला समर्पित करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी ईश्वराची प्राप्ती व्हावी यासाठी भरपूर कष्ट उपसले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. भगिनी निवेदितासारखी एक विदेशी मुलगी भारतात येऊन राहिली व तिने भारत समजून घेण्यासाठी, हिंदू धर्म समजून घेण्यासाठी, ईश्वरप्राप्तीसाठी आपले जीवन समर्पित केले. भारताला विविध गोष्टींसाठी आपले जीवन समर्पित करणार्‍या कर्मयोगांची आवश्यकता आहे. आजकाल वन डे इंटरनॅशनल आणि टी ट्वेंटीचा जमाना आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट लगेच प्राप्त झाली पाहिजे, हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो. एखादी गोष्ट मला लगेच समजली पाहिजे, यश मला लगेच मिळाले पाहिजे, पैसा मला लगेच मिळाला पाहिजे. दीर्घकाळ एखाद्या गोष्टीवर कार्य करीत त्यातून सत्याचे मोती बाहेर काढण्याची कोणाला तळमळ लागलेली नाही. त्यामुळे यशस्वी व्हायचे असेल तर दीर्घकाळ एखाद्या गोष्टीची साधना करणारे विद्यार्थी हवे आहेत. केवळ विदेशी लोकांची, नट-नट्यांची, खेळाडूंची नक्कल करून आम्ही मोठे बनू शकत नाही. प्रत्येक झाड आपला जीवनरस त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे जमिनीतून शोषून घेत मोठे होत असते तसेच प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे. त्याने त्याच्या स्वभावाला अनुकूल असा जीवनरस समाजातून, निसर्गातून शोषून मोठे झाले पाहिजे व इतरांना सावली दिली पाहिजे तरच तो विद्यार्थी यशस्वी आहे, असे म्हणता येईल.

 

– 9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)