मुंबई: लोकसभेची निवडणूक सुरु असतांना भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वेळापत्रक ८ मे रोजी जाहीर केले होते. यानुसार विधान परिषदेच्या २ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी १० जून रोजी मतदान होणार होते. तर १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आयोगाकडून नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. या निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी अनेक शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या निवडणुकीमुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर गेलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणे शक्य नव्हते. परंतु, निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या सोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर हायकोर्टात याचिकाही केली होती. या निवडणुकीसाठी १० जून ही तारीख निश्चित करण्यात आल्याने मे महिन्याच्या सुट्टीसाठी बाहेर गेलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणे शक्य नव्हते . यामुळे ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आली होती. त्याच बरोबर शिक्षक संघटनांनी आयोगाला निवडणूक पुढे ढकलावी यासाठी निवेदन देखील दिले होते.
राज्यात शिक्षण विभागाने २ मे १४ जून अशी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचारी सुट्टीसाठी गावी गेले असल्याने ते ११ जूननंतर परत येतील. राज्यातील शाळा १५ जूननंतर सुरू होणार असल्याने शिक्षक आणि अन्य कर्मचारी मतदानापासून वंचित राहू शकतील असे संघटनेचे म्हणणे होते. तसेच १७ जून ते २० जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षकांचा मताधिकार सुरक्षित केल्याबद्दल सुभाष किसन मोरे यांचे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी अभिनंदन केले.
तुळशीराम सोनवणे, समन्वयक माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा