टीम इंडियाची मिशन वर्ल्डकपची यशस्वी सुरुवात!

कोलकाता : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा 4 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2 – 0 अशी विजय आघाडी घेतली. भारताने श्रीलंकेचे 216 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. विशेष म्हणजे, या मालिका विजयसह भारताने मिशन वर्ल्डकपची दमदार सुरुवात केली आहे.

श्रीलंकेच्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहितला यावेळी १७ धावा करता आल्या. त्यानंतर शुभमन गिलही २१ धावांवर बाद झाला. या दोघांनी पहिल्या वनडे सामन्यात दमदार सलामी दिली होती. पण या सामन्यात मात्र ते दोघेही अपयशी ठरले.

त्यानंतर विराट कोहली आला होता. विराट आता या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण कोहली या सामन्यात वाईट पद्धतीने क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले. गेलय सामन्यातील शतकवीर कोहलीला यावेळी ४ धावांवर बाद झाला.

श्रेयस अय्यरला यावेळी मोठी खेळी साकारण्याची संधी होती, पण त्याला २८ धावांवर समाधान मानावे लागले. पण यावेळी एकामागून एक विकेट्स पडत असताना लोकेश राहुल यावेळी संघासाठी धावून आला. राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्यामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. पण हार्दिक ३६ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. पण त्यानंतर राहुलने चांगला किल्ला लढवला आणि अर्धशतकासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने त्याने केले. कुलदीपने या सामन्यात तीन विकेट्स घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्यानंतर मोहम्मद सिराजनेही श्रीलंकेच्या शेपटाला गुंडाळले. त्यामुळे श्रीलंकेला आपल्या पहिल्या डावात २१५ धावा करता आल्या होत्या.