आयएनएस अरिघातवरून के-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

#image_title

विशाखापट्टणम् : भारतीय नौदलाने आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात ‘वरून ३,५०० किमीचा पल्ला असलेल्या के-४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. विशाखापट्टणम्च्या किनाऱ्याजवळ आज सकाळी ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली.

‘आयएनएस अरिघात’ ही देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ऑगस्टमध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अरिघातवरून घेण्यात आलेली के-४ क्षेपणास्त्राची ही पहिली चाचणी आहे. के-४ क्षेपणास्त्र हे घन-इंधन आहे. सहा हजार टन वजनाच्या ‘आयएनएस अरिघात’ पाणबुडीतून प्रक्षेपित करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के-४ क्षेपणास्त्र सरावाचा एक भाग म्हणून प्रक्षेपित केले गेले. संपूर्णपणे कार्यरत पाणबुडीतून या क्षेपणास्त्राची चाचणी घेणे हे भारतीय नौदल क्षमतेसाठी मैलाचा दगड ठरला आहे.

शत्रूच्या ठिकाणांवर गुप्तपणे हल्ला करण्याची क्षमता

अरिघातच्या समावेशाने भारताचा दबदबा वाढला आहे. अरिघातवरून साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदणाऱ्या के-४ ची चाचणी घेण्यात आली आहे. युद्धाच्या स्थितीत ही पाणबुडी शत्रूच्या किनारपट्टीवर गुप्तपणे जाऊ शकते आणि मोक्याच्या ठिकाणांवर हल्ला करू शकते.

भारताचे ब्रह्मास्त्र

अरिघात पाणबुडीचे वजन सहा हजार टन असून, लांबी ११२ मीटर आहे. ही पाणबुडी सागरी पृष्ठभागावर कमाल १२-१५ नॉटस् आणि पाण्याखाली २४ नॉटस् वेग देऊ शकते. ‘अरिघात’मध्ये दुहेरी हुल. बॅलास्ट टँक, दोन सहायक इंजिन आणि आपत्कालीन स्थितीत शक्ती आणि गतीवर नियंत्रण ठेवणारे भ्रस्टर आहेत. किनाऱ्यावर शांतपणे गस्त घालणाऱ्या आण्विक पाणबुडीमुळे भारतावर कोणताही देश अण्वस्त्र हल्ला करण्याचे धाडस दाखविणार नाही.