---Advertisement---
---Advertisement---
पारंपरिक युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम असलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित सामरिक क्षेपणास्त्र प्रलयची यशस्वी चाचणी सोमवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. ते ५०० ते १००० किलोंची स्फोटके वाहून नेऊ शकते.
पारंपरिक युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम असलेले हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने विकसित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे क्षेपणास्त्र शत्रूच्या धोक्यांविरुद्ध सशस्त्र दलांना अधिक तांत्रिकदृष्ट्या बळकटी देईल, असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि प्रकल्पात सहभागी संबंधित उद्योग भागीदारांचे कौतुक करताना सांगितले.
क्षेपणास्त्र प्रणालींची कमाल आणि किमान पल्ल्याच्या क्षमतेचे प्रमाणीकरण करण्यासाठी मूल्यांकन चाचण्यांचा एक भाग म्हणून या उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या. या क्षेपणास्त्रांनी अचूकपणे अपेक्षित मार्गक्रमण केले आणि सर्व चाचणी उद्दिष्टे पूर्ण करीत अचूकपणे लक्ष्यभेद केला, असे संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले.
सर्व उपप्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली. त्याची पडताळणी एकात्मिक चाचणी श्रेणीद्वारे तैनात केलेल्या विविध मागोवा घेणाऱ्या संवेदकांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आली. यात क्षेपणास्त्र धडकणार होते, त्या ठिकाणाजवळ जहाजावर तैनात केलेल्या एका उपकरणाचाही समावेश होता.
स्वदेशी बनावटीचे क्वासी क्षेपणास्त्र
प्रलय हे स्वदेशी बनावटीचे घन प्रणोदन क्वासी-बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. जे अचूकता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक मार्गदर्शन आणि नेव्हिगेशनचा वापर करते, असे मंत्रालयाने म्हटले आहे.