अशी संकटे येती…!

अग्रलेख

सातत्याने संकटे सहन करावी लागली की त्याचीदेखील सवयच होऊन जाते आणि संकटांचा सामना करीत जगणे हीच जीवनशैली होऊ लागते. असे होत गेले तर संकटांचे गांभीर्य संपुष्टात येऊ लागते आणि बेभरवशीपणावरील विश्वास वाढू लागतो. शाश्वत जगण्याचा विश्वास संपत जातो आणि जगण्याचा हक्क हा पहिला हक्क आहे, याचादेखील विसर पडू लागतो. अशा मानसिकतेतील समाज हा समूह म्हणून सहसा संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्जदेखील राहात नाही आणि स्वसंरक्षणासाठी ज्या यंत्रणांवर अवलंबून राहावयाचे, त्या यंत्रणांवर आपल्या जगण्याची भिस्त सोडून देऊन तो जगत राहतो. गेल्या काही वर्षांत संकटांच्या असंख्य मालिका जगभरात विविध देशांतील समाजसमूहांनी सोसल्या. कोणास दहशतवादाचा सामना करावा लागला, तर कोणी दुष्काळासारख्या संकटांत होरपळले. कोणी महापुरांसारख्या संकटांसमोर हतबल झाले, तर कोणास उष्णतेच्या लाटांचे चटके सोसावे लागले. कोणी नैसर्गिक आपत्तींची शिकार झाले, तर कोणी मानवनिर्मित संकटांसमोर गुडघे टेकले. अशा वेगवेगळ्या संकटांच्या मालिका जेव्हा समाजाच्या जगण्यास आव्हान देऊ लागतात, तेव्हा सर्वात दुर्बल समाजघटकांस त्याचा पहिला फटका सोसावा लागतो.

अशा वेळी हे घटक संरक्षणाच्या अपेक्षेने समाजातील सबलांवर निर्भर असले, तरी प्रत्येकासच संकटे सोसावी लागत असल्याने व स्वसंरक्षण ही प्रत्येकाच्याच प्राधान्याची बाब असल्याने दुर्बलांकडे दुर्लक्ष होते आणि संघर्षाची बीजे रुजू लागतात. मनुष्य हा समूहाने राहणारा, समाजप्रिय प्राणी आहे हे खरे असले, तरी संकटकाळात त्याच्या समाजप्रियतेची कसोटी सुरू होते आणि स्वार्थ किंवा परोपकार यांचा संघर्ष सुरू होतो. अशा काळात मानवतेच्या संकल्पनेची खरी परीक्षा असते. बहुधा एका विशिष्ट पातळीपर्यंत ही संकल्पना जपण्याचा आटोकाट प्रयत्न होत असला, तरी अनेकदा संकटांची तीव्रता एवढी भीषण असते की, ज्याला त्याला आपल्यासमोरील संकटास तोंड देताना ही संकल्पना विसरणे नाईलाजाने भाग पडते आणि अखेर, मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकटांस शरण जाण्याची वेळ येते. ही केवळ कोणा एका देशाची, राज्याची किंवा समाजाची समस्या नाही. ती सार्वत्रिक समस्या असल्याने संघटितपणे त्याचा सामना करण्याची गरजही अनेकदा अधोरेखित झाली आहे. नव्या शतकात सहकार्याची आणि सामूहिकपणे संकटांस तोंड देण्याची गरज अधिक तीव्र झाल्यामुळे जगातील अनेक देश आता सहकार्यासाठी सरसावले असले, तरी या भावनेतून निर्माण झालेल्या ऐक्याची खरी परीक्षा पाहणारे संकट उद्भवलेले नाही, हे सध्या तरी सुदैवच मानावे लागेल.

तथापि, स्थानिक पातळीवरील संकटांचा सामना करण्याकरिता अशा सामूहिक प्रयत्नांचा पुरेपूर वापर करण्याची गरज आता वाढत असल्याने, संभाव्य संकटांना तोंड देताना भविष्यात जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना स्थानिक स्तरापर्यंत पोहोचविणे आता शक्य होणार आहे. जी-२० सारख्या संघटित राष्ट्रसमूहांनी ही गरज ओळखली आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटांना आमंत्रणे देणा-या मानवी कृतींना आवर घालण्यावर या राष्ट्रांत होऊ घातलेले एकमत हे एक सुचिन्ह म्हणावे लागेल. शिवाय, या उपाययोजनांच्या कृती कार्यक्रमात भारताचे स्थान महत्त्वाचे राहणार, ही बाब आता नि:संशयपणे अधोरेखित झाल्याने मानवी सुरक्षिततेच्या संकल्पनांना आश्वस्ततेचा आधार मिळणे शक्य झाले आहे. अवर्षण, अतिवृष्टी, उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटा, महापूर, वादळे अशा संकटांनी गेल्या काही वर्षांत जगण्याला चहुबाजूंनी असे काही वेढले आहे की, ही संकटे हा जणू जीवनशैलीचाच एक भाग बनून गेला असावा, अशीच समजूत बळावू लागली आहे वर्षागणीक यापैकी कोणते ना कोणते संकट कोणत्या ना कोणत्या ठिकाणी घोंघावतच असते. यंदाच्या तीव्र उन्हाळ्याची काहिली अजूनही आपल्याकडे संपलेली नाही. जून महिन्याच्या मध्यावरदेखील आकाशात अभावाने दिसणारे ढग आणि त्यापलीकडून आग ओकणा-या सूर्याच्या उन्हाळी झळा हे संकट आता आपण सारे अनुभवतो आहोत.

खरे म्हणजे, निसर्गचक्राच्या सवयीनुसार पिढ्यापिढ्यांच्या प्रथा पाळत शेतीच्या कामास लागणारा शेतकरीदेखील या नव्या संकटाने चक्रावून गेला आहे. गेल्या दोन वर्षांत या वादळी संकटास तोंड देताना राज्यातील शेतकरी अक्षरशः कोलमडून गेला. निसर्ग नावाच्या वादळाने निसर्गाचीच नासधूस केली, तर तोक्ते नावाच्या चक्रीवादळाने शेतकèयाच्या घामातून उभ्या राहिलेल्या व भावी पिढ्यांच्या जगण्याचे साधन ठरू पाहणा-या पिकांना जमीनदोस्त करून विश्रांती घेतली. यंदा अगोदरच लांबलेल्या पावसाचे संकट समोर ठाकले असताना, बिपरजॉय नावाच्या वादळाने महाराष्ट्रास वळसा घातला असला, तरी शेजारच्या गुजरातच्या किनारी भागातील जनतेची धास्ती वाढविली आहे. हे वादळ किनारपट्टीवर येऊन थडकेल तेव्हा कोणता धुमाकूळ घालेल, याचा अजूनही नीटसा अंदाज आलेला नाही. त्यामुळे वादळाच्या संभाव्य संकटाचा सामना करण्याकरिता यंत्रणा सज्ज असूनही अशाश्वताच्या भीतीने समाजास ग्रासलेले आहे. या वादळाचा थेट तडाखा महाराष्ट्रास बसणार नाही, असा अंदाज असला, तरी अशी संकटे आपले अप्रत्यक्ष परिणाम मात्र दाखवतच असतात. तापमानातील बदल, अल् निनोसारख्या ठाण मांडून बसलेल्या समस्यांमुळे अगोदरच जीवनशैलीला विळखा घातलेला आहे. या संकटांचा अप्रत्यक्ष फटका मान्सूनच्या नियमित पावसाळ्यास बसल्यामुळेच यंदाचा पाऊस लांबल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

या लांबलेल्या पावसाचा फटका पेरण्यांना बसला आहे. जेमतेम तीन-चार टक्के शेतांतील पेरण्या पार पडल्या असल्या, तरी आता रुजून वर येण्यासाठी आसुसलेल्या कोंबांवर करपून जाण्याचीच वेळ आल्याने त्यादेखील वाया जाण्याची भीती आहे. महानगरांना पाणीपुरवठा करणा-या जलाशयांतील साठे तळाशी जाऊन विसावलेले आहेत आणि ग्रामीण भागांतील अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करू लागली आहेत. आता अशी संकटे हे नित्याचेच झाल्याने, त्यावरील उपाययोजनांचे पाढे वाचणे हादेखील एक परिपाठ झाला आहे. दरवर्षी महापूर आले की, पुरामुळे होणारी हानी कमीत कमी व्हावी याकरिता संबंधित यंत्रणा कामाला लागतात. वेगवेगळे अभ्यास सुरू होतात, जुन्या बासनात नव्या अहवालांची भरदेखील पडते.जवळपास प्रत्येक पावसाळ्यात महापुराएवढेच भय दाखविणारे आणखी एक संकट गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या डोंगरी भागावर दबा धरून बसलेले असते. सुमारे दहा वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण नावाच्या एका गावावर डोंगराचा उभा कडा कोसळला आणि अवघे गाव जमिनीखाली गाडले गेले. तेव्हापासून या संकटाची भीती डोंगरी भागात सर्वत्र संचार करू लागली आहे.

दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील तळिये गावावर याच संकटाने घाला घातला. गावातील अनेक घरे डोंगराच्या ढिगा-याखाली गाडली गेली. ४० हून अधिक रहिवाशांचा मृत्यू झाला आणि मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या यादीत, दरडी कोसळण्याच्या संभाव्य संकटाची भर पडल्याने यंत्रणांनी सतर्कतेचे इशारे देण्यास सुरुवात केली. याआधी या संकटांना तोंड द्यावे लागलेल्या कुटुंबांच्या स्थैर्याचे प्रश्न अद्याप पुरते सुटलेले नाहीत. म्हणूनच, संकटे येऊन गेल्यानंतर ज्या यंत्रणा आपत्ती निवारणासाठी सरसावतात, त्याप्रमाणे संकटे येऊच नयेत किंवा कोणत्याही संकटाची तीव्रता कमीत कमी असावी यासाठीच्या उपाययोजनांची प्रतीक्षा मात्र कधीच संपत नाही. आजवर अनेक वादळे झेलली, महापुरासारख्या संकटांनी अनेक संसार उद्ध्वस्त केले, उन्हाच्या तडाख्याने अनेकांना अकाली अखेरचा श्वास घ्यावा लागला, कित्येकांवर थंडीच्या कडाक्याचे संकट दाटलेले असते, नैसर्गिक आपत्तींनी तर घर केले आहे. त्यामुळे त्या आपत्ती ओढवल्यानंतर जागे होण्यापेक्षा, आपत्तींना थोपविणा-या उपायांची गरज आहे. जागतिक पातळीवरील ऐक्याच्या प्रयत्नांतून असे काही हाती लागले, तर जीवनशैलीला लागलेली संकटे झेलण्याची सवय सुटणे सोपे होईल आणि जगणे शाश्वत होईल.