जळगाव : येथील एका तरुणाने आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे या उक्तीप्रमाणे आधी सर्वानी मतदान करा असे आवाहन करत आपले लग्न १३ मे नंतर निश्चित केले आहे. त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोकशाहीत मतदानाचे महत्व अन्यन्यसाधारण आहे. यानुसार देशात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली असून १३ मे रोजी जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. या लोकशाहीच्या मोठ्या पर्वात मतदान करण्यासाठी युवा पिढीत उत्साह दिसून येत आहे. याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे मंडल क्र. ४ चे कार्यकर्ते हृषिकेश शिंपी याचा आज रविवार, ५ मे रोजी लग्न बंधन म्हणजेच रुपया नारळ सोहळा झाला. यासोबत साखरपुडा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, आधी लगीन कोंढाण्याचे या उक्तीप्रमाणे लोकसभा निवडणुकीत १३ मे रोजी या दिवशी सर्वानी मतदानाचा हक्क बजवावा मग आपण लग्न सोहळा संपन्न करू असा निर्णय ऋषिकेशने घेतला. लोकशाही बळकट करण्यासाठी ऋषिकेश याने उचलले हे उल्लेखनीय पाऊल आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाचा टक्का वाढावा व मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रशासन विविध प्रयत्न करत असतांना ऋषिकेशने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच भाजप व शिंपी समाज युवक कार्यकर्त्यांनीही त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.