अखेर ‘तो’ साखर कारखाना विक्री

जळगाव : जिल्हा बँकेने ताब्यात घेतलेल्या मधुकर साखर कारखान्याच्या विक्रीवर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला असून त्यास संचालकांनी सर्वानुमते मंजूरी दिली असल्याची माहिती चेअरमन गुलाबराव देवकर यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीसंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा बँकेने ताब्यात घेतलेल्या मधुकर साखर कारखाना व जे.टी. महाजन सुतगिरणीची मागील महिन्यात विक्री करण्यात आली होती. मात्र त्यावेळी मधुकर कारखान्याच्या विक्रीचा अंतीम निर्णय १० तारखेपर्यंत तहकुब करण्यात आला होता. आज संचालक मंडळाच्या बैठकीत पुन्हा मधुकर कारखाना विक्रीवर चर्चा करण्यात आली. तब्बल दीड तासांच्या चर्चेनंतर मधुकर कारखाना विक्रीला संचालक मंडळाने सर्वानुमते मंजूरी दिली. हा कारखाना मुंबई येथील इंडीया बायो ऍण्ड ग्रो या कंपनीने खरेदी केला असून, संबधित कंपनीला ६३ कोटींची पुर्ण रक्कम तीन महिन्यात जिल्हा बँकेकडे जमा करण्याचा सूचना दिल्या असल्याचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

सात दिवसात १५ टक्के रक्कम भरण्याच्या सूचना निविदा काढण्यात आली त्यावेळी संबधित कंपनीने १० टक्के रक्कम भरली होती. निविदा निश्चित झाल्यानंतर सोमवारी या कंपनीने १५ टक्के रक्कम भरली आहे. उर्वरीत ७५ टक्के रक्कम भरण्यासाठी जिल्हा बँकेने १ महिन्याची मुदत दिली होती. मात्र, संबधित कंपनीने तीन महिन्याची मुदत मागितली. जिल्हा बँकेने ही रक्कम भरण्यास मुदतवाढ दिली असली तरी उर्वरीत दोन महिन्यांसाठी ११ टक्के व्याज घेण्यात येणार असल्याचे गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

जिल्हा बँकेने जे.टी.महाजन सुतगिरणी व मसाका विक्री करून, एकूण ७० कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. बँकेचा संचित तोटा ९७ कोटी इतका आहे. ही रक्कम संचित तोट्यात ७० कोटींची रक्कम टाकल्यास संचित तोटा २७ कोटींवर येणार असून एनपीए देखिल कमी होणार असल्याचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी व्हाईस चेअरमन शामकांत सोनवणे, संचालक एकनाथ खडसे, डॉ.सतीश पाटील, ऍड.रविंद्र पाटील, संजय पवार, आमदार अनिल पाटील, घनश्याम अग्रवाल, जनाबाई महाजन, महापौर जयश्री महाजन, मेहताबसिंग नाईक, प्रदीप देशमुख,कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.